जळगाव : महामार्गालगतच्या हॉटेलमध्ये देहविक्री करताना आढळून आलेली १९ वर्षीय बांगला देशी तरुणी पाच महिन्यांपूर्वीच भारतात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पासपोर्ट, व्हिसा नसताना जळगावात आढळून आलेली ही बांगलादेशी तरुणी भारत-बांगलादेशाच्या सीमावर्ती भागातून कोलकाता येथून घुसखोरी करून भारतात आल्याचे तपासात समोर आले आहे. भारतात वेगवेगळ्या ठिकाणाहून ती मुंबईत पोहचली व तेथून ती जळगावात आल्याची माहिती तिने चौकशी दरम्यान पोलिसांच्या पथकाला दिली आहे.
रविवारी उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या आदेशावरून एमआयडीसी पोलिसांनी शहराच्या महामार्गालगतच्या दोन हॉटेलमध्ये सुरू असलेल्या अवैध देहविक्रीच्या अड्ड्यावर बनावट ग्राहक पाठवून छापा मारून दोन तरुणींना अटक केली आहे. या कारवाईत नीलेश राजेंद्र गुजर (वय २४, रा. रामेश्वर कॉलनी), चेतन वसंत माळी (वय २१, रा. गणपतीनगर कुसुंबा) व हॉटेलचा व्यवस्थापक विजय सखाराम तायडे या तिघांना ताब्यात घेते. तसेच शिरपूर येथील एक महिला व यश हॉटेलमधील रूममध्ये बांगलादेशची नागरिक असलेली तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्या दोघींना आशादीप शासकीय महिला वसतिगृहात कोर्टाच्या आदेशाने ठेवण्यात आले आहे. दरम्यान, ज्या चित्रकूट हॉटेलमध्ये अवैध देहविक्रीचा व्यवसाय सुरू होता. ती हॉटेल महिलेच्या नावावर असून, ती हॉटेल चालवण्यासाठी विजय सखाराम तायडे याने घेतलेली आहे. काही महिन्यांपूर्वीच देहविक्रीच्या व्यवसायाला सुरुवात केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे.
पाच महिन्यांपूर्वीच कोलकाता मार्गे भारतात, मुंबई, नाशिकनंतर एजंटच्या मध्यस्थीने जळगावात !
बांगलादेशची तरुणीला सोमवारी पोलिसांनी विचारपूस केली असता ती गेल्या पाच महिन्यांपूर्वीच – कोलकाता मार्गे भारतात आली. तेथून ती मुंबई येथे काही महिने थांबून देहविक्रीचाच व्यवसाय करीत होती. त्यानंतर नाशिक येथून तिला एजंटच्या मध्यस्थीने जळगावात आणल्याचे तिने पोलिसांना सांगितले.
तरुणीकडे न पासपोर्ट,न व्हिसा ; पुन्हा बांगलादेशात पाठविणार ?
बांगलादेशी तरुणीकडे पासपोर्ट, व्हिसा अथवा भारतात रहिवासाविषयीचे कोणतेही कागदपत्रे नव्हते. त्यामुळे आता तिला कोर्टाच्या आदेशाने पुन्हा बांगलादेशात पाठविण्याची तरदूत केली जाईल, अशी देखील माहिती पोलिसांनी दिली आहे. परंतु कोर्टाचे आदेश येत नाही, तोपर्यंत ही तरुणी महिला वसतिगृहात राहील, असेही कळतेय.