चोपडा (प्रतिनिधी) देशाच्या स्वातंत्र्य संग्रामातील १९४२ च्या चले जाव चळवळीत सहभागी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक तथा शहरातील प्रख्यात गुळाचे व्यापारी मोहनलाल छोटालाल गुजराथी (वय-९९) यांच्या जन्मशताब्दी निमित्त गुजराथी वाडीत आयोजित छोटेखानी कौटुंबिक सोहळ्याला विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा.अरुणभाई गुजराथी यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात प्रारंभ करण्यात आला.ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक मोहनलाल गुजराथी यांना स्वातंत्र्य संग्रामातील योगदान आणि जन्मशताब्दी निमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन केले.
शहरातील गुजराथी गल्लीतील स्व.छोटालाल वेडूसा गुजराथी यांच्या सामाजिक व देशप्रेमाने ओटीपोत भरलेल्या कुटुंबात ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक मोहनलाल गुजराथी यांचा दि.१५ नोव्हेंबर १९२४ रोजी जन्म झाला.इंग्रजांच्या काळात स्वातंत्र्य चळवळीत गुजराथी गल्लीत स्व.स्वातंत्र्य सैनिक छोटालाल गुजराथी यांच्या कुटुंबात देशातील अनेक काँग्रेस नेत्यांचा राबता असल्याने मोहनलाल गुजराथी यांना बालपणीच संस्कारा बरोबर भारत पारतंत्र्यातून मुक्त होण्यासाठी स्वातंत्र्य लढ्याचे बाळकडू मिळाले.वडील स्व. छोटालाल वेडूसा गुजराथी व आई स्व.गोपीबाई यांच्याकडून देशप्रेमाचा वारसा मिळाला होता. मंतरलेल्या दिवसात त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत १९४२ च्या चलेजाव चळवळीत सहभाग घेतला. साने गुरुजी शहरात आले असता इंग्रज सरकारने त्यांना दिसता क्षणी पकडण्याचे आदेश काढले होते म्हणून सानेगुरुजी चोपड्यात भूमिगत झाले. त्यांना चोरवाटेने अमळनेरला सोडायला जातांना ऑगस्ट १९४२ मध्ये वयाच्या १८ व्या वर्षी अटक करण्यात येऊन धुळे जिल्हा कारागृहात ६ महिने जेलमध्ये ठेवले होते.
जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक मोहनलाल गुजराथी यांचे वडील स्वर्गीय छोटलाल गुजराथी यांनी १९३० मध्ये स्वातंत्र्य लढ्यात इंग्रज सरकार विरुध्द अंदोलन केल्याने त्यांना सहा महिन्यांचा कारावास झाला होता.तसेच आई स्वर्गीय गोपीबाई गुजराथी यांनी स्वातंत्र्य आंदोलनात १९४२ च्या चळवळीत चोपडा तहसील कचेरीवर तिरंगा फडकावल्याने त्यांना अटक करण्यात येऊन धुळे कारागृहात ठेवण्यात आले होते.स्वर्गीय छोटलाल गुजराथी यांनी १९३६ मध्ये फैजपूर येथील काँग्रेसच्या अधिवेशनात योगदान देत विविध जबाबदारी पार पडली.तसेच त्यांनी व्यापारात नावलौकिक प्राप्त केला होता.देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त दि.१५ ऑगस्ट २०२३ रोजी स्वातंत्र्य दिनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक मोहनलाल गुजराथी यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील व तत्कालीन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या हस्ते सत्कार करण्यात येऊन गौरविण्यात आले होते.चोपडा कसबे सोसायटीचे चेअरमन प्रवीण विठ्ठलदास गुजराथी यांचे ते मामा होत.