नाशिक (वृत्तसंस्था) चांदवड तालुक्यातील वडाळी तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या एका तरुणाचा मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकलेल्या अवस्थेत विहिरीत आढळून आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. रोशन ज्ञानेश्वर झाल्टे, असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
वडाळी नजीक येथील रोशन ज्ञानेश्वर झाल्टे हा तरुण मंगळवारी (दि.१७) सकाळपासून घरून कामानिमित्त गेला होता. मात्र तो पुन्हा घरी परतला नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांकडून पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याबाबत तक्रार दाखल केली. पोलीस त्याचा शोध घेत असताना गुरुवारी (दि.१९) अखेर त्याचा मृतदेह साकोरे मिग शिवारातील एका विहिरीत संशयास्पदरीत्या आढळून आला.
याप्रकरणी प्राथमिक तपासात राजेशचा खूनच झाल्याचे समोर आल्याने पिंपळगाव पोलिसांनी तत्काळ तपासाची सूत्र फिरवित संशयित हृषिकेश घुमरे ( रा. उंबरखेड ) व ओमकार डेलें (उंबरखेड रोड, पिंपळगाव बसवंत ) या दोघांना ताब्यात घेतले. दोघांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी खुनाची कबुली दिली. या प्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, नाशिक ग्रामीणचे पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील भामरे यांनी या खुनाच्या घटनेचा आढावा घेतला असून, पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक पवार तपास करीत आहेत.