धुळे (प्रतिनिधी) साक्री तालुक्यातील पिंजारझाडी गावाजवळ असलेल्या साबरसोंडा गावात कौटुंबिक वादातून मुलाने वडिलांचा खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुलाविरुध्द साक्री पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुलास अटक केली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
यासंदर्भात, पिंजारझाडी गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेले साबरसोंडा गावात राहणारे शामराव भिवसन जगताप (६५) व त्यांचा मुलगा प्रकाश शामराव जगताप (४५) या पिता-पुत्रात कौटुंबिक वाद होता. हा वाद दि. २ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास शिगेला गेल्याने मुलगा प्रकाश जगताप याने वडील शामराव जगताप यांच्या डोक्यात लोखंडी पहारीने वार करून त्यांचा खून केला. या प्रकरणी मृत शामराव जगताप यांची पत्नी व संशयित आरोपी प्रकाश जगताप याच्या आईने साक्री पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, साक्री पोलिसांनी काल (दि. ३) रोजी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून संशयित आरोपी प्रकाश जगताप यास अटक केली.