कोल्हापूर (वृत्तसंस्था) बंद यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यात विविध स्तरातून बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी सकाळी त्यांच्या शिरोळ येथील घराबाहेर कृषी विधेयकांची होळी केली. केंद्र सरकारने तातडीने भांडवलदारधार्जिने कृषी कायदे रद्द करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
नव्या कृषी विधेयकांना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदला कोल्हापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अपवाद वगळता जिल्ह्यातील सर्व दैनंदिन व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शिरोळ येथील त्यांच्या घराबाहेर कृषी विधेयकांची होळी करीत विधेयके तातडीने रद्द करण्याची मागणी केली. भाजप वगळता इतर राजकीय पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांच्या भारत बंदला सक्रीय पाठिंबा दिला आहे. जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमधील व्यवहार ठप्प झाल्याने बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट आहे. शहरातील शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, सराफ बाजार, महाद्वार रोड, राजारामपुरी या महत्त्वाच्या व्यापारी पेठा बंद ठेवण्यात आल्याने शहरात शुकशुकाट होता. काँग्रेस कमिटी कार्यालयासह शहरात ठिकठिकाणी काळे झेंडे लावून काँग्रेसने कृषी कायद्यांचा निषेध केला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील प्रमुख मार्गांवरून मोटारसायकल रॅली काढून कृषी कायद्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.