चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील आदिवासी कोळी नागरिकांना टोकरे कोळीचे दाखले सुलभपणे मिळावेत, यासाठी कोळी समाजाचे जगन्नाथ बाविस्कर यांनी समाज बांधवांसह चोपडा प्रांत अधिकारी कार्यालयासमोर दि. ९ ऑगस्ट आदिवासी क्रांतिदिनापासून अन्नत्याग सत्याग्रह व आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनाला पाचव्या दिवशीपर्यंत अनेक समाज बांधवांनी व अनेक संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. सोमवारी तालुक्यातील कोळी समाज बांधवांनी या अन्न सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी येथील शासकीय विश्रामगृहापासून शेकडो समाज बांधव मूक मोर्चात सहभागी झाले होते. चोपडा प्रांत कार्यालयापर्यंत हा मूक मोर्चा नेण्यात आला. विशेष म्हणजे एकाने धोतर तीर कामठा व आदिवासी आदिवासी मानवाची प्रतिमा म्हणून पेहराव परिधान केला होता. यावेळी महिलाही मूक मोर्चात सामील झाल्या होत्या. यावेळी पं.स.चे माजी सभापती डी.पी. साळुंखे, मगन बाविस्कर, लखीचंद बाविस्कर, गोपाल देवराज, प्रेमनाथ बाविस्कर, शांताराम बाविस्कर उपस्थित होते.