जळगांव प्रतिनिधी
जळगांव जिल्ह्यातील धरणगांव शहरातील पुरातन व प्रसिद्ध असलेल्या श्री चिंतामणी मोरया मंदिराचा उत्थापन प्राणप्रतिष्ठा सोहळा १९ जानेवारी ते ७ फेब्रुवारी पर्यन्त श्री चिंतामणी मोरया ट्रस्टच्या माध्यमातून संपन्न होणार आहे. मंदिरातील गणेशाची मूर्ती ही पुरातन काळातील असून ३०० वर्षापूर्वीची असल्याने जीर्ण झाली आहे. या मूर्तीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी उत्थापन व वज्रलेपन प्रक्रिया करण्यात येणार आहे, ज्यामुळे मूर्तीचे आयुष्य वाढणार आहे. जवळपास ८ ते १० दिवस या मूर्तीवर वज्रलेपन करण्यात येणार असल्याने या काळात मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे. भाविकांना फक्त मंदिराच्या बाहेरून दर्शन घेता येणार आहे.
वज्रलेपन कार्य पूर्ण झाल्यानंतर 4 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी पर्यंत प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला असून शेवटच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तर मंदिर 8 फेब्रुवारी 2025 रोजी भक्तांसाठी पुन्हा खुले केले जाणार आहे.
4 फेब्रुवारी २०२५ रोजी श्री बालाजी मंदिर ते श्री चिंतामणी मोरया पर्यंत प्रायश्चित्त करून कलश शोभायात्रा काढण्यात येणार आहे. ४ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान संत महात्म्यांच्या हस्ते विविध कार्यक्रम पार पडणार आहेत.
सदर कार्यक्रम सोहळा अमळनेरचे प. पु. संत श्री. सखारामजी महाराज, धरणगांवचे ह.भ.प. श्री. भगवान महाराज यांच्या आशीर्वादाने श्री. नयन भाई सराफ, श्री. विजय भाई गुजराथी, श्री. विरेंद्र भाई गुजराथी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. प्रसंगी प्राणप्रतिष्ठेचे आचार्य श्री. रविंद्र पंढरीनाथ पंडित गुरुजी तर प्राणप्रतिष्ठेचे कर्माचार्य अमळनेरचे श्री. केशव पुराणीक गुरुजी असणार आहेत.
चिंतामणी मोरयाचे, ‘गणपती मंदिर’ हे पवित्र स्थान मानले जाते. याठिकाणच्या मूर्तीची उत्पत्ती गूढतेने झालेली आहे. येथील ‘गणपती’ – भक्तांच्या हृदयात खोलवर रुजलेला आहे. तर भारतात कुठेही नसलेली हातात नारळ घेवून उभी असलेली हनुमानाची मूर्ती याठिकाणी असून हनुमान रोज सकाळी गणपतीला नारळ चढवित असल्याचे शाश्र याठिकाणी असल्याची माहिती श्री नयनशेठ यांनी दिली.
सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा तसेच यथोचित दान करण्याचे आवाहन श्री चिंतामण मोरया ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.