मुंबई (वृत्तसंस्था) “कोरोनाचा संसर्ग हवेतूनही होतो. संसर्गित व्यक्तीच्या नाकातल्या स्रावातून, ड्रॉपलेट्समधून पसरतो, हे लक्षात घ्यायला हवं. गेल्या सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ यावर चर्चा सुरू आहे, की कोरोना कसा पसरतो. माझ्या मते कोरोना हा पृष्ठभाग आणि हवा अशा दोन्ही माध्यमातून पसरतो. असे दिल्लीतील एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी स्पष्ट केलं आहे. घरात राहून, सर्व काळजी घेऊनही कोरोना का होतो याचं त्यांनी कारण दिलं आहे.
डॉ. गुलेरिया यांनी सांगितलं, सुरुवातीला ड्रॉपलेट थिअरीवर भर दिला गेला होता. शिंकण्या-खोकण्यातून बाहेर आलेले ड्रॉपलेट्स पृष्ठभागावर पडून, तिथून इन्फेक्शन पसरत होतं. त्यामुळे सुरुवातीला पृष्ठभाग डिसइन्फेक्ट केले जात होते. पण गेल्या काही महिन्यांमधल्या अभ्यासातून असं स्पष्ट झालं आहे की, एअरोसोल्स अर्थात पाच मायक्रॉनपेक्षा लहान आकाराच्या कणांद्वारेही तो पसरू शकतो. हे कण हवेत जास्त काळ राहू शकतात”. “एखादी खोकणारी-शिंकणारी व्यक्ती खोलीत तुमच्यापासून दोन मीटर अंतरावर असेल आणि तुम्ही त्या व्यक्तीच्या जवळून गेलात, तर तुम्हाला संसर्ग होऊ शकतो. म्हाताऱ्या व्यक्ती घराबाहेर पडत नसतील. पण बाहेरून येणाऱ्या व्यक्ती उदा. घरकाम करणारी स्त्री, काही तरी दुरुस्तीसाठी येणारा मेकॅनिक आदी व्यक्तींमध्ये लक्षणं दिसत नसली, तरी ते कोरोनाचे वाहक असू शकतात. ते घरात येऊन संसर्ग पसरवू शकतात”, असं गुलेरिया म्हणाले.
“त्यामुळे टेस्ट निगेटिव्ह आलेल्या व्यक्तींव्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तींच्या संपर्कात तुम्ही येणार असाल, तर त्या सर्व व्यक्ती कोरोना पॉझिटिव्हच आहेत, असं समजूनच वागायला हवं. शारीरिक अंतर, मास्क घालणं, हातांची स्वच्छता या उपायांचा कायम अवलंब करायला हवा. घरातली हवा खेळती राहणंही गरजेचं आहे. त्यासाठी खिडक्या उघड्या ठेवायला हव्यात. कारण त्यामुळे घरातल्या हवेत चुकून संसर्ग पसरला असेलच, तर तो बाहेर जाऊ शकतो”, असा सल्लाही डॉ. गुलेरिया यांनी दिला आहे.