जळगाव (प्रतिनिधी) आपण सात पानांची फिर्याद दिली असून पोलिसांच्या ऑनलाईन पोर्टलवर दीड पानांची एफआयआर दिसत आहे. त्यामुळे माजी मंत्री गिरीश महाजन हे तीन वर्षापूर्वीच्या घटनेचा गुन्हा आता दाखल केला असं म्हणताय. परंतु गुन्हा तीन वर्षापूर्वीच्या घटनेचा नव्हे, तर आमच्या छळवणूकीचा घटनाक्रम तेव्हापासून तर आतापर्यंत अर्थात २०१९ च्या अखेरपर्यंतचा असल्याचा खुलासा आज एका पत्रकार परिषदेत अॅड. विजय पाटील यांनी केला. एवढेच नव्हे तर माझे बंधू नरेंद्र अण्णा यांचा मृत्यू याच छळवणूकीतून झाला असल्यामुळे आपण पोलिसांकडे सदोष मनुष्यवधाचे कलम गुन्ह्यात वाढविण्याची मागणी करणार असल्याचे अॅड. पाटील यांनी सांगितले.
माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेऊन अॅड. विजय भास्कर पाटील यांच्यावर विविध आरोप केले होते. यावर आज अॅड. विजय भास्कर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन गिरीश महाजन यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. यावेळी अॅड. पाटील म्हणाले की, फौजदारी गुन्हा हा कधीही आणि कुठेही दाखल करता येतो. २०१९च्या अखेर पर्यंत गिरीश महाजन हे राज्याचे महत्वाचे मंत्री होते. यामुळे पोलीस त्यांच्याविरुद्ध फिर्याद घेणार नाहीत हे मला माहित होते. आमच्या छळवणूकीचा घटनाक्रम तेव्हापासून तर आतापर्यंत अर्थात २०१९ च्या अखेरपर्यंतचा आहे. मध्यंतरी मी कोरोना पॉझिटीव्ह होतो. क्वॉरंटाईन असतांना आपण निंभोरा येथे वास्तव्यास होतो. यामुळे आपण निंभोरा येथे फिर्याद दिली आहे. तसेच आपण सात पानांची फिर्याद दिली असून पोलिसांच्या ऑनलाईन पोर्टलवर दीड पानांची एफआयआर दिसत आहे. या फिर्यादीत आपण तीन लाखांची भोईटे यांना खंडणी दिली. तर एक लाख रुपयाची लाच पोलीस निरिक्षक गायकवाड यांना दिल्याचा खळबळजनक आरोप देखील विजय पाटील यांनी लावला.
मागणी नसताना ३१८ दिवसांपर्यंत संस्थेत पोलिस बंदोबस्त का लावला
विजय पाटील पुढे म्हणाले की, गिरीश महाजन यांनी आपला कुठलाही संबंध नूतन मराठा संस्थेशी नसल्याचे सांगितले. परंतू हे साफ खोटे आहे. मराठा विद्या प्रसारक मंडळाची निवडणूक ही सहकार कायद्यानुसार झालेली असतानाही कार्यकारिणी रद्द करण्यात आली. एवढेच नव्हे तर आमच्या ताब्यातून हे ऑफीस भोईटे गटाच्या ताब्यात देण्यात आले. तसेच ३१८ दिवसांपर्यंत या संस्थेत पोलिस बंदोबस्त कुणाचीही मागणी नसताना देण्यात आला. खरं म्हणजे महाजन यांचे मित्र खटोड आणि झंवर यांच्या माध्यमातून नूतन मराठाच्या एक हजार कोटींच्या जमीनीवर गिरीश महाजन यांचा डोळा असल्याचा गंभीर आरोप देखील अॅड. विजय पाटील यांनी केला.
महाजनांनी अनेक संस्था काबीज केल्या आहेत
अॅड. विजय पाटील यांनी आरोप केला की, गिरीश महाजन यांनी जामनेर येथील जैन समाजाची शिक्षण संस्था. तसेच जामनेर येथीलच उर्दू शाळेच्या जागेवर कॉम्लेक्स बांधले. यानंतर पहूर येथील लेले ताब्यात घेत चेअरमन बनले. चाळीसगाव येथील राष्ट्रीय विद्यालयाची जमीन विकत घेत तेथे शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधकाम सुरु आहे. याच पद्धतीने नूतन मराठा हडप करण्याचा महाजनांनी प्रयत्न केला. दरम्यान, २०१६ साली झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत आपण गिरीश महाजन यांचे बिनविरोध करण्याची विनंती न ऐकल्यामुळे तेव्हापासून गिरीश महाजन यांनी माझा मानसिक छळ सुरु केला.
वॉटरग्रेस कंपनीबाबत महाजन औरंगाबादमधील हॉटेलमध्ये चार दिवसांपूर्वी एकाला भेटले
वॉटरग्रेस कंपनीशी आपला संबंध नसल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटले असले तरी नाशिक, धुळे व जळगाव येथील त्यांच्या समर्थकांनी या कंपनीला महापालिकेचे कंत्राट दिले, असे पाटील म्हणाले. एवढेच नव्हे तर, गिरीश महाजन यांनी औरंगाबाद येथील अँबेसेडर हॉटेलमध्ये चार दिवसांपूर्वी कुणाला भेटले व यात काय चर्चा झाली याची विचारणा त्यांना करा असेही श्री. पाटील पत्रकारांना म्हणाले. तसेच महाजन यांनी नाव सांगितले नाही तर, मी तुम्हाला नाव सांगेन, असेही श्री. पाटील म्हणाले.