मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्राचे सरकार घटनाबाह्य,बेकायदेशीर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायधीशांनी सांगितलेले असतानाही त्यावर अंतिम निर्णय होत नाही, हे संविधान व लोकशाहीचे दुर्दैव आहे. महाराष्ट्रात जे सरकार चालवले जात आहे, तीच संविधानची हत्या आहे. पैशाच्या जोरावर क्रॉस व्होटिंग करून घेतले तीसुद्धा संविधानाची हत्या असून आम्हाला मिळणारी प्रत्येक तारीख हीसुद्धा संविधानाची हत्याच आहे, असा संताप खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
शिवसेनेच्या आमदार अपात्रतासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आता १४ ऑगस्टला सुनावणी होणार आहे. या प्रकरणात सतत दिल्या जाणाऱ्या तारखांवरून संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सुनावणी पुढे ढकलून मिळणाऱ्या तारखांमुळे आमदारांना प्रोत्साहन मिळत आहे. एका पक्षाच्या तिकिटावर निवडून यायचे व सरकारमध्ये सामील व्हायचे, कोट्यवधी पैसे घेऊन दुसऱ्या पक्षाला मत द्यायचे, हे सुरू आहे. त्याविरोधात न्यायालयात दाद मागितली तर ते तारखांवर तारखा देतात. आम्हाला मिळणारी प्रत्येक तारीख ही संविधानाची हत्याच आहे, अशी टीकाही राऊत यांनी यावेळी केली.