खामगाव (वृत्तसंस्था) घरातील पाण्याच्या टाकीत पडून दहावर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पळशी बुद्रुक येथे घडली आहे. आर्यन कृष्णा नागे (वय १०, रा. पळशी बु, ता. खामगाव)असे मृत मुलाचे नाव आहे.
१७ मे रोजी आर्यनची आई आणि वडील हे बोरी अडगाव येथे बाजारात गेले होते. त्यामुळे आर्यन घरी एकटाच होता. खेळता-खेळता पाणी घेण्यासाठी आर्यन घरातील टाकीत गेला. यावेळी त्याचा पाय घसरून तो टाकीत पडला. त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला. काही वेळानंतर आर्यनची मामी या टाकीवर पाणी घेण्यासाठी गेल्या असता ही भयंकर घटना त्यांच्या निदर्शनास आली.
घरी परतल्यावर आर्यनचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याचे कळताच त्याच्या आई-वडिलांनी एकच हंबरडा फोडला. आईने केलेला आक्रोश मन हेलावून सोडणारा होता. यावेळी उपस्थितांचे डोळे देखील पाणावले होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्याच्या टाकीतून बाहेर काढला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.