नागपूर (वृत्तसंस्था) बारशाच्या कार्यक्रमाचासर्वत्र आनंद असताना अचानक मैत्रिणींसोबत खेळता खेळता तोल जाऊन भाजीच्या गंजात ४ वर्षांची चिमुकली पडली. गंभीररीत्या भाजल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्रिशा बालू पानबुडे, असे मृतक चिमुकलीचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे त्रिशाचाच लहान बहिणीच्या बारशाचा हा कार्यक्रम होता. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
वाठोडा हद्दीत १४ ऑक्टोबर रोजी दुपारी ५.३० वाजताच्या सुमारास श्रावणनगर येथे ही घटना घडली. त्रिशाचे वडील बालू पानबुडे हे सलून चालवितात आणि वानखेडे यांच्या घरी किरायाने राहतात. त्यांना तीन मुली आहेत. त्यात त्रिशा ही दुसऱ्या नंबरची होती. तिसऱ्या मुलीच्या बारशानिमित्त सायंकाळी जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्व महिला कार्यक्रमात व्यस्त होत्या तर त्यांचे चिमुकले खेळण्यात गुंग होते. या लहान मुला-मुलींसोबत त्रिशाही खेळत होती. खेळता खेळता तोल जाऊन ती बाजूलाच ठेवलेल्या गरम भाजीच्या गंजात पडली. ही बाब लक्षात येताच आजूबाजूच्यांनी तिला क्षणार्धात बाहेर काढले, पण कोवळी त्वचा आणि भाजी गरम असल्याने ती ५० टक्के भाजली. तिला उपचाराकरिता न्यू इरा हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले होते.
तेथून तिला मेडिकल हॉस्पिटल वॉर्ड क्र. ४ मध्ये भरती करण्यात आले होते. उपचारादरम्यान २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.४५ वाजताच्या सुमारास डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी प्राप्त वैद्यकीय सूचनेवरून वाठोडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.