जामनेर (प्रतिनिधी) मधमाशीच्या विषारी डंखाने जामनेर तालुक्यातील तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची र्दैवी घटना तालुक्यातील लोंढ्री बुद्रूक येथे घडलीय. अमजद खाँ अस्लम खाँ पठाण(वय, २८) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
या संदर्भात अधिक असे की, अमजदखॉं पठाण यांचे शेंगोळे रस्त्यावर शेत आहे. सोमवारी सकाळी मजुरांच्या जेवणाचे डबे देऊन घराकडे निघाले होते. परंतू वाटेत त्यांच्या जिभेला मधमाशीने चावा घेत ती घशात गेली. यामुळे पठाण यांना असह्य वेदना होण्यास सुरुवात झाली. त्यांनतर श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. पण प्राथमिक उपचार मिळेपर्यत त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन मुले, मुली व भाऊ असा परिवार आहे. लोंढ्री गावात त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, मधमाशीचा डंख विषारी असल्याने शरीरातील अवयव निकामी होऊन रक्तचाप कमी झाल्यामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.