मुंबई (वृत्तसंस्था) महाविकास आघाडीचे 25 आमदार राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते. असा दावा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी धुळवडीच्या दिवशी केला होता. त्याला आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तुमचेच 50 आमदार आमच्या संपर्कात आहे, असे प्रत्युत्तर दिले आहे. तसेच दानवेंना काल काय बोललो ते आज आठवणार नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत बोलताना म्हणाले की, “काल धुळवड होती. लोक धुळवडीला नशा करतात, अशी परंपरा आहे. पण माझ्याकडे अशी माहिती नाही की, रावसाहेब दानवे भांग पितात. रावसाहेब दानवे भांग वैगरे पित नाहीत. माझे चांगले मित्र आहेत ते. मी त्यांना अनेक वर्ष पाहतोय. दिल्लीत माझ्या बाजूलाच राहतात. त्यांना भांगेची किंवा इतर कोणतीही नशा करण्याची आवश्यकता पडली नाही. तरीपण ते कोणत्या नशेत बोलले काल धुळवडीला ते मला माहीत नाही. ते 25 बोललेत कदाचित त्यांना 175 बोलायचं असेल. की, 175 आमदार महाविकास आघाडीचे आमच्या संपर्कात आहेत. स्लिप ऑफ टंग झाली असेल. घ्या ना, मग थांबलात कशासाठी? या फुसकुल्या कोणासाठी सोडताय?” “जर मी म्हटलं की, भाजपचे 50 आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि आहेतच. तर तुम्ही काय म्हणाल? पण आता होळी संपलेली आहे. रात्री नशा उतरलेली असेल. त्यामुळे काल काय बोललो ते त्यांना आता आठवणार नाही.”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
















