जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासन, प्रशासन, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अत्याधुनिक सोयीसुविधा तयार होत असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आपल्याला लवकरच यश मिळेल. यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी माझे कुटूंब, माझी जबाबदारी अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा. असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांनी केले.
सदा ग्यान फाऊंडेशन व रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कोविड रुग्णालयात तयार करण्यात आलेल्या ऑक्सीजनयुक्त बेडच्या वाढीव वॉर्डाचे लोकार्पण पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ बी एन पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद, इंन्सिडंट कमांडर गोरक्ष गाडीलकर, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण, नगरसेवक विष्णू भंगाळे, रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलच्या अध्यक्षा अपर्णा भट, सचिव जितेंद्र बरडे, चेअरमन महेंद्र रायसोनी आदि उपस्थित होते.
पालकमंत्री ना. पाटील पुढे म्हणाले की, जिल्ह्यात पूर्वी कोरोनाचे स्वॅब तपासणीसाठी लॅब नव्हती. राज्य शासनाकडे याचा मी सतत पाठपुरावा केल्याने टेस्टीग लॅब जिल्ह्याला मिळाली. अन्यथा पूर्वी चार ते आठ दिवसानंतर येणारे अहवालाच्या तक्रारी, रुग्णांच्या तक्रारी, आरोग्य सुविधांची वानवा असे अनेक प्रश्न होते. ते प्रश्न या लॅबमुळे निकाली निघाले. आता जिल्ह्यात आपली स्वतःची टेस्टींग लॅब आहे, जिल्ह्यात आयसीयू बेड, ऑक्सिजन बेड, व्हेटींलेटर याची उपलब्धता आहे. यामुळे कोरोना बाधीतांवर त्वरीत अत्याधूनिक प्रकारचे उपचार होत आहे. आता कोरोना बाधीतांचा मृत्यूदरही खाली आला आहे. यामुळे जिल्हा सुविधांबाबत राज्यातील प्रमुख शहरांतील रुग्णालयाचाही पुढे गेला आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश येत आहे. त्यास जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींचे सहकार्य लाभले आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी राबविलेल्या ‘बेड साईड असिस्टंट’ पॅटर्नची मुख्यमंत्र्यांनी दखल घेत कौतुक केले आहे. सोबतच सर्व विभागाच्या यंत्रणेने रात्रंदिवस घेतलेल्या मेहनतीमुळे जिल्ह्यात कोरेाना बाधित रुग्ण संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे, मृत्यूदरही खाली येत आहे. जिल्ह्यास प्राप्त झालेल्या विविध निधीच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणेने अत्याधुनिक सुविधा उभारण्यावर भर दिल्याने मुंबईच्या रुग्णालयांबरोबरीच्या सुविधा जळगावला मिळत आहे. सामाजीक संघटनांनी केलेल्या सहकार्य व अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेमुळे हे शक्य झाले आहे. यापुढील काळातही सामाजिक संस्थांनी आपले योगदान द्यावे असे आवाहनही त्यांनी केले.
पालकमंत्री म्हणाले की, आगामी काळासाठी आमची आरोग्य यंत्रणा सज्ज असली तरी पुढील काळातील दुर्गात्सवासह येणारे सण, उत्सव भाविकांनी, नागरिकांनी सोशल डिस्टनींगचे पालन करीत साधेपणाने साजरे करावेत. सर्वांनी कोरोनाबाबत काळजी घेताना तोंडाला मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन केले.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सज्ज असून आता जिल्ह्यात अगदी दर २५ किमीवर ऑक्सीजन बेडची सुविधा उपलब्ध होत असल्याचे सांगत आगामी नवरात्रोत्सव व दिवाळीत काळजी घ्या, नियम पाळा. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले़. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ एऩ एस़. चव्हाण यांनी जिल्हाभराचा ऑक्सिजन बेडचा आढावा मांडला़. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ़ जयप्रकाश रामानंद यांनी कोविड रुग्णालयात झालेल्या बदलांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्प प्रमुख महेंद्र रायसोनी यांनी केले.