अहमदनगर (वृत्तसंस्था) अहमदनगर- छत्रपती संभाजीनगर रोडवरील नेवासा फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात ५ जणांचा ओढ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी मध्यरात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली. मृतांमध्ये एका चिमुकलीसह तीन महिला व चालकाचा समावेश आहे. या अपघातातून १३ वर्षीय मुलगी सुदैवाने बचावली आहे.
अशी आहेत मयतांची नावं !
वसीम हारुण मुल्ला (४१), अनसुरा बेगम हारुण मुल्ला (४१, दोघे रा. मोमीनपुरा, छत्रपती संभाजीनगर), रेश्मा मोमीन हलदार (३५), हसीना बेगम हरुण पठाण (५४) व सामिया मोमीन हलदार (१४, तिघे रा. आळेफाटा, ता. जुन्नर ) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे आहेत. मासुमा मोमीन हलदार (१३) ही मुलगी या अपघातातून बचावली आहे.
कारवरील नियंत्रण सुटल्याने झाला अपघात !
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील एकाच कुटुंबातील नातेवाईक छत्रपती संभाजीनगरकडे जात होते. नेवासा फाट्याजवळील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाजवळ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. भरधाव वेगातील कार पुलाचे कठडे तोडून रस्त्यालगत असलेल्या ओढ्यात कोसळली. रात्रीची वेळ असल्यामुळे अपघातस्थळी मदतकार्य वेळेवर न मिळाल्याने कारमधील प्रवाशांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. नशीब बलवत्तर होते म्हणून मासुमा हलदार ही मुलगी अपघातातून बालंबाल वाचली.
एकाच कुटुंबातील ५ जण मृत्युमुखी !
अपघातात मृत्युमुखी पावलेल्या व्यक्तींवर नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सोमवारी सकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या अपघात प्रकरणी हरुण अमीर मुल्ला (४३, रा. छत्रपती संभाजीनगर) यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, एकाच कुटुंबातील ५ जण मृत्युमुखी पडल्याने कुटुंबावर शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.