बीड (वृत्तसंस्था) अंबाजोगाई येथील भूमी अभिलेख कार्यालयातील सहायक पदावर कार्यरत कर्मचारी दुसऱ्यांदा लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकल्याची घटना घडली आहे. मुबारक बशीर शेख (५७), असे या कर्मचाऱ्याचे नाव असून यापूर्वीही त्याला परंडा या ठिकाणी सन २०१६ मध्ये आरोपी मुबारक शेखला लाच घेताना पकडण्यात आले होते.
बर्दापूर येथील शेतजमीन गट क्र. ५३२, ५३३ ची कायदेशीर फीस भरुन तक्रारदाराने मोजणी करुन घेतली होती. सदर मोजणीचे हद्द कायम नकाशे व इतर संबंधित कागदपत्रे भूमी अभिलेख कार्यालय येथून प्राप्त करण्यासाठी तक्रारदार यांनी अर्ज केला होता. परंतू मुबारक बशीर शेख याने शासकीय फीस वगळता अतिरिक्त एक हजार रुपयांची तक्रारदार यांच्याकडे मागणी केली. परंतू तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी बीड एसीबीकडे तक्रार दिली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. आरोपी शेख यांनी तक्रारदार यांच्याकडे १००० रुपयांची मागणी केली व पंचासमक्ष कक्षात तक्रारदार यांच्याकडून स्वीकारताच त्याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. यानंतर मुबारक शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलिस अंमलदार सुरेश सांगळे, भारत गारदे, संतोष राठोड, नामदेव उगले यांनी ही कारवाई पार पाडली.