रत्नागिरी (वृत्तसंस्था) कोकण रेल्वेच्या मार्गावर भोके ते उक्षी दरम्यान राजधानी एक्स्प्रेसला अपघात झाला आहे. त्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. राजधानी एक्स्प्रेस रुळावरून घसरले असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. रेल्वे सेवा पूर्वपदावर करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे.
कोकण रेल्वेच्या मार्गावर भोके ते उक्षी दरम्यान बोल्डर मार्गावर पडल्याने राजधानी एक्सप्रेसच्या इंजिनचे एक चाक मार्गावरून उतरल्याने कोकण रेल्वेची वहातुक थांबली आहे. ही घटना आज सकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. हजरत निजामुद्दीन ते मडगाव अशी ट्रेन धावत होती.
या घटनेनंतर कोकण रेल्वेची यंत्रणा घटना स्थळी तात्काळ रवाना झाली आहे आणि इंजिन मार्गावर आणण्याचे काम सुरू झाले आहे. यामुळे कोकण रेल्वेच्या मार्गावर विविध गाड्या विविध स्थानकात थांबवण्यात आल्या आहेत. या घटने मध्ये कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नसून सर्व प्रवासी डबे मार्गावर पूर्णतः सुरक्षित असल्याचे कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले आहे. पुढील काही तासात मार्ग पूर्ववत होईल असे ही त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, एकीकडे कोकण रेल्वे मार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे. दुसरीकडे मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. चिपळूणमधील वशिष्ठी नदीवरील जुना पूल वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे मार्गावर वाहनांची मोठी रांगा लागल्या आहे. विकेंडला कोकणात आलेल्या प्रवाशांचे हाल होत आहे. मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण येथे वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या आहेत.