जळगाव (प्रतिनिधी) शहरातील नातेवाईकाच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी वडील, मुलगा आणि त्यांचे तीन मित्र एकाच दुचाकीवरून फुफनी (ता. जळगाव) येथून निघाले. परंतू वाटेतच चौघांना ट्रॅक्टरने उडविले. या अपघातात ज्ञानेश्वर रामराव सपकाळे (वय ४१) यांचा जागीच मृत्यू झाला, तर मयत ज्ञानेश्वर यांचा मोठा मुलगा डिगंबर सपकाळे (वय १९) आणि त्यांचे मित्र राजेंद्र सोनवणे (वय ४८), निलेश शांताराम निकम (वय ४५) हे जखमी झालेत. किनोद गावाच्या पुढे सावखेडा फाट्यावर आज दुपारी हा भीषण अपघात झाला.
तालुक्यातील फुफणी येथील रहिवाशी ज्ञानेश्वर सपकाळे हे आज मंगळवार (दि.16) रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास दुचाकीने जळगाव शहरातील नातेवाईकाकडे विवाह सोहळासाठी येत होते. त्यांच्यासोबत दुचाकीवर मोठा मुलगा डिगंबर सपकाळे, त्यांचे मित्र राजेंद्र रामचंद्र सोनवणे आणि निलेश निकम हे तिघे जण होते. किनोद गावाच्या पुढे सावखेडा फाट्यावर सावखेडाकडून येणाऱ्या एका ट्रॅक्टरने वळण रस्त्यावर सपकाळे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवरील इतर तिघे दूर फेकले जात जखमी झाले.
दरम्यान, जवळच्या नातेवाईकाकडे लग्न असल्याने, मयत ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या पत्नी वंदना सपकाळे या सकाळीच लग्नाच्या ठिकाणी पोहचल्या होत्या. पतीसोबत येणाऱ्या मोठ्या मुलाचीही त्या लग्नाच्या ठिकाणी वाट पाहत होत्या. पण पतीच्या मृत्यूची आणि मुलगा गंभीर जखमी असल्याची बातमी आल्यानंतर मात्र, त्यांनी मन हेलावून सोडणारा आक्रोश केला. यावेळी उपस्थितांचे डोळे देखील पाणावले होते. थोड्याच वेळात या घटनेने लग्नाघरावर शोककळा परसरली. मयत ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या पश्चात तीन मुलं, पत्नी, आई असा परिवार आहे.