नवी दिल्ली (वृत्तसंस्था) रशिया आणि युक्रेन यांच्या युद्ध सुरु झाल्याला आज पाचवा दिवस आहे. एक-दोन दिवसात युद्ध संपेल अशी शक्यता होती. (Russia Ukraine Conflict) मात्र, युक्रेनने चोख प्रत्युत्तर देत रशियाला जोरदार टक्कर दिली आहे. या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर तणाव निर्माण झाला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर या युद्धात जगातील महत्त्वाचे देश प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे हस्तक्षेप करत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
युद्धाचा पाचवा दिवस
रशिया-युक्रेनमध्ये मागील चार दिवसांपासून युद्ध सुरू आहे. सोमवारी पाचव्या दिवशीदेखील युद्ध सुरूच आहे. रशियाने केलेल्या हल्ल्याला युक्रेनकडून जोरदार प्रतिकार सुरू आहे. रशियन सैन्यातील 4300 हून अधिकजणांना प्राण गमवावे लागले असल्याचे युक्रेनने म्हटले आहे. तर, रशियाच्या हल्ल्यात 116 मुलांसह 1684 नागरीक जखमी झाले असल्याचे युक्रेनने सांगितले. तर, जीवितहानीबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
UNGA ची आपात्कालीन बैठक
संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेने संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत एक आपात्कालीन विशेष सत्र बोलवण्याचा निर्णय घेतला आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत याबाबतच्या प्रस्तावाच्या बाजूने 11 मते पडली. तर, रशियानेच याच्या विरोधात मतदान केले. भारत, चीन आणि संयुक्त अरब अमिरातीने या मतदानात सहभाग घेतला नाही. 28 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी ही बैठक होणार आहे. संयुक्त राष्ट्र संघात 1950 पासून आतापर्यंत 10 विशेष आपात्कालीन सत्र बोलावण्यात आले होते. सोमवारी होणार ही बैठक 11 वी बैठक असणार आहे.
बेलारूसमध्ये युक्रेन-रशिया चर्चा होणार
दोन्ही देशांमध्ये सुरू असलेले युद्ध आणि अन्य युरोपीयन देशांद्वारे रशियात लावण्यात आलेल्या निर्बंधानंतर रविवारी रशियन अधिकाऱ्यांनी युक्रेनच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यावर सहमती दर्शवली. रशियाचे सैन्य अधिकारी राजनयिक चर्चेसाठी बेलारूसच्या गोमेल शहरात दाखल झाले आहे.
युक्रेनमध्ये घनघोर युद्ध
रशियाकडून युक्रेनवर जोरदार हल्ले सुरू आहेत. रशियन फौजांनी युक्रेनची राजधानी कीववर ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. रशियन फौजांनी कीवला वेढा घातला आहे. युक्रेनमधील दुसरे मोठं शहर खारकीवमध्ये दोन्ही देशांदरम्यान भीषण युद्ध सुरू आहे. रशियन सैन्याने या शहरात प्रवेश करण्यास यश मिळवले तरी युक्रेनच्या सैन्याकडून तीव्र प्रतिकार सुरू आहे. त्यामुळे रशियन सैन्य पुन्हा माघारी गेले आहे.
कीवमध्ये रशियन सैन्याचा प्रवेश
रशियाकडून सुरू असलेल्या हल्ल्यात सैनिकांसह नागरिकांनाही प्राण गमवावे लागले आहे. रशियन सैन्याकडून कीव शहरावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. रशियन सैन्याच्या वेढ्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. कीव शहराचे महापौर व्हिटाली क्लिट्सको यांनी म्हटले की, रशियन सैनिकांनी आम्हाला चारही बाजूने घेरले आहे. मात्र, संघर्ष करत राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
युक्रेन सैन्याच्या गणवेशात रशियन फौजा
रशियन सैन्याने युक्रेनच्या सैनिकांचा गणवेश परिधान करून कीवकडे कूच सुरू केली असल्याचा दावा युक्रेनने केला आहे. रशियन सैन्याने लष्काराच्या अनेक वाहनांचा ताबा मिळवला आहे. त्यानंतर आता युक्रेनचा लष्करी गणवेश आणि वाहनांचा वापर करून कीव शहरात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत.
जी-7 देशांकडून युक्रेनला मदत
रशियन हल्ल्याला तोंड देण्यासाठी जी-7 देशांकडून लष्करी आणि आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी सांगितले. युक्रेन आणि जी-7 देशांची बैठक पार पडली.
युरोपियन युनियनकडून लढाऊ विमाने आणि शस्त्रांची मदत
युरोपियन युनियनने युक्रेनला लढाऊ विमाने आणि अत्याधुनिक शस्त्रे देण्याचा निर्णय घेतला आहे. युरोपियन युनियनच्या वरिष्ठ प्रतिनिधी जोसेफ बोरेल यांनी फेसबुकवर सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन अॅण्ड इन्फोर्मेशन सिक्युरिटीद्वारे ही घोषणा केली. युक्रेनला 50 कोटी युरोचे लढाऊ विमाने आणि शस्त्र देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
30 देशांकडून युक्रेनला मदत
युक्रेनच्या मदतीला अनेक देश सरसावले आहेत. अमेरिकेने रशियासोबत लढण्यासाठी 600 दशलक्ष डॉलरची संरक्षण मदत देण्याची घोषणा केली आहे. फ्रान्सदेखील युक्रेनला शस्त्र देणार आहे. तर, मदतीसाठी स्वीडनला लष्करी, तांत्रिक आणि मानवीय मदत देण्यात येणार आहे. त्याशिवाय, ब्रिटन, नेदरलँड, पोलंड आणि लिथुआनिया यांनीदेखील मदत करण्याची घोषणा केली आहे.















