मँचेस्टर (वृत्तसंस्था) मँचेस्टर येथे खेळवण्यात येणाऱ्या पाचवा कसोटी सामना भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट (ईसीबी) मंडळाने रद्द केला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे.
बीसीसीआय आणि ईसीबीच्या अधिकाऱ्यांनी पाचव्या कसोटीसंदर्भात गुरुवारी आणि शुक्रवारी सविस्तर चर्चा करुन सर्व शक्यता पडताळून पाहिल्या. दोन्हीकडील अधिकाऱ्यांमध्ये सामन्याच्या आयोजनासंदर्भात चर्चा झाली. त्यानंतर सामन्याला अगदी काही तास शिल्लक असताना केलेल्या चर्चेनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो या भीतीने सामना रद्द करण्यात आलाय. यासाठी दोन्ही क्रिकेट मंडळांकडून क्रिकेट चाहते आणि सामन्याशी संबंधित इतर सहकाऱ्यांची माफीही मागण्यात आलीय. भारतीय संघामधील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची भीती असल्याने सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला जात आहे असं ईसीबीने स्पष्ट केलंय. भारतीय संघ मैदानामध्ये उतरु शकत नाही असा उल्लेखही ईसीबीच्या अधिकृत पत्रकामध्ये आहे. तसेच सामना रद्द झाला असला तरी मालिका बरोबरीमध्ये सुटणार की भारताकडे चषक दिला जाणार याची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.
गुरुवारी भारतीय संघातील खेळाडूंची एक बैठक झाली. या बैठकीमध्ये संघातील अनेक खेळाडूंनी पाचवा कसोटी सामना न खेळण्याच्या बाजूने मत नोंदवलं होतं. संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून इंडियन प्रिमियर लिगचं उर्वरित पर्व खेळवलं जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर खेळाडू संसर्गाच्या भीतीने खेळण्याबद्दल फारसे उत्साही नसल्याचं म्हटलं आहे. कोरोना पॉझिटीव्ह आलेले फिजिओ परमार हे रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, मोहम्मद शामी, इशांत शर्मा यासारख्या खेळाडूंसोबत काम करत होते. सोमवारी संपलेल्या कसोटीसामन्यापर्यंत परमार या खेळाडूंसोबतच होते.
















