नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जगभराची चिंता बनलेल्या ओमायक्रोनने भारतात एन्ट्री केलीच होती. तर आता राजधानी दिल्लीत देखील ओमायक्रॉनचा रूग्ण सापडला आहे. यापूर्वी महाराष्ट्रात देखील कल्याण डोंबिवलीमध्येही ओमायक्रॉनचा रूग्ण सापडला होता. यामुळे आता देशातील ओमायक्रॉन रूग्णांची संख्या पाचवर पोहोचली आहे.
जगभरात चिंतेचं वातावरण निर्माण करणाऱ्या ओमायक्रॉन व्हेरिएंटनं दोन दिवसांपूर्वीच भारतात प्रवेश केला होता. कर्नाटकमध्ये दोन कोरोनाबाधितांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंट आढळल्यानंतर गुजरात आणि त्यापाठोपाठ महाराष्ट्रात डोंबिवलीमध्ये देखील ओमायक्रॉन व्हेरिएंटचे कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यानंतर आता देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेला कोरोना रुग्ण आढळल्यामुळे ओमायक्रॉन रुग्णांची देशातील संख्या आता पाचवर गेली आहे. टांझानियामधून आलेल्या प्रवाशांमध्ये हा रुग्ण आढळला असून गंभीर बाब म्हणजे भारतात आलेले एकूण १७ परदेशी प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या सगळ्यांचे नमुने जेनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच त्यांच्या ओमायक्रॉन व्हेरिएंट आहे किंवा नाही, याविषयी खात्रीशीर माहिती मिळू शकेल.
“दिल्लीत पहिला ओमायक्रॉन व्हेरिएंटचा रुग्ण आढळला आहे. रुग्णाला एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तो नुकताच टांझानियामधून परतला होता. आत्तापर्यंत विदेशातून आलेल्या एकूण १७ लोकांची कोरोना चाचणी पॉजिटिव्ह आली आहे. त्या सगळ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे”, अशी माहिती दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली आहे.