धरणगाव (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमी असलेल्या धरणगावात कुणबी (मराठा) समाजात पहिल्यांदाच दि. २८ एप्रिल २०२२ रोजी चि.सौ.कां.रूपाली व चि.हर्षल यांचा धरणगाव नगरीतील पहीला ऐतिहासिक शिवविवाह मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
काल्पनिक मनुवादी व्यवस्थेने निर्माण केलेल्या अनिष्ट रुढी परंपरेला पूर्णपणे छेद देऊन पारंपारिक वैदीक पद्धतीला फाटा देत धरणगाव येथील सौ.आशा व प्रभाकर भिला पाटील यांची कन्या तसेच बहुजन महापुरूषांच्या विचारांचा जागर करणारे व्याख्याते लक्ष्मणराव पाटील सर यांची लहान बहीण चि.सौ.कां.रूपाली आणि शिंदोळ येथील सुनिता व निंबा सुपडू सोनवणे यांचे चि. हर्षल या उच्चशिक्षित नवदांपत्यांचा शिवविवाह आनंदमय वातावरणात संपन्न झाला.
या विवाहामध्ये अक्षता म्हणून तांदुळ (धान्य) ऐवजी विवीध रंगाचे फुले व पाकळ्यांचा वापर करण्यात आला. तत्पूर्वी, जगद्गुरू तुकाराम महाराज, माँसाहेब जिजाऊ, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहूजी महाराज आणि घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वधू-वरांच्या आई वडिलांनी माल्यार्पण करून पुष्पांजली अर्पण केली. खरं म्हणजे या शिव विवाह सोहळ्याला वरपिता निंबा सुपडू सोनवणे यांनी संमती दिली म्हणून हे शक्य झालं. आई – वडिलांच्या संस्कारातून वाढलेले वर आणि वधू नक्कीच सामाजिक परिवर्तनाच्या कार्यात सहभागी होतील व एक आगळा आदर्श निर्माण करतील असा आशावाद याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी वधू-वर यांच्या हातात राष्ट्रीय ग्रंथ भारताचे संविधान व महात्मा फुले समग्र वाड्मय घेऊन आगमन झाले. महात्मा फुले म्हणजे खऱ्या अर्थाने शिवराय व बाबासाहेब यांच्यातील मुख्य दुवा आणि संविधान म्हणजे या देशाची वाटचाल समतेच्या दिशेने व्हावी यासाठीचा मार्गदर्शक ग्रंथ. शिव विवाह सोहळ्याला शहर व परिसरातील वैचारीक, सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, शिक्षण, कृषी, पत्रकार, प्रशासकीय अधिकारी इ. नानाविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती देऊन वधू व वरास आशीर्वाद दिले.
या शिव विवाहाचे कार्य व प्रबोधन पर माहिती देत विधीकर्ते आर.बी.पाटील यांनी शिव विवाह मंगलाष्टके म्हणून विवाह लावला. त्याचबरोबर कन्या सन्मान, सप्तपदी इ.विविध विधी आर.बी.पाटील, प्रा. विश्वासराव पाटील अमळनेर, राजेंद्र वाघ धरणगाव यांनी केले. सत्यशोधकीय लक्ष्मणराव पाटील यांनी शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर या महामानवांच्या आदर्शांचे पालन करीत जाती-धर्म भेद दूर ठेवून आणि कालबाह्य रूढी-परंपरांना बाजूला सारून शिवविवाह पद्धतीने बहिणीचा विवाह करीत धरणगाव व परिसरातील सर्वच समाजासमोर एक मोठा आदर्श घालून दिला आहे. धरणगाव सारख्या ग्रामीण भागात नुकताच संपन्न झालेल्या या विवाह सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शिवराय फुले शाहू आंबेडकर ह्या महापुरुषांनी केलेल्या कार्यात जातीभेदाला आणि धर्म भेदाला स्थान नसल्याने आपणही कोणत्याही धार्मिक रीतिरिवाज शिवाय आणि कालबाह्य रूढी परंपरांना वगळून विवाह करू शकतो. शिव विवाह सोहळ्यास आलेल्या पाहुण्यांचे शब्द सुमनांनी स्वागत व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रविंद्र मराठे यांनी तर उपस्थितांचे आभार लक्ष्मणराव पाटील यांनी मानले. या विवाह सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी समस्त कुणबी पाटील पंच मंडळ, जय हिंद व्यायाम शाळा, जय हिंद गणेश मित्र मंडळ, शहीद भगतसिंग मित्र मंडळ, सत्यशोधक विचारमंच, विकल्प ऑर्गनायझेशन, साईबाबा कामगार संघटना, परीसरातील माळी, चौधरी, मराठे, भावसार, खत्री इ. सर्व समाज बांधव तसेच गावातील व परिसरातील आलेल्या सर्व मित्र परिवाराने परिश्रम घेतले. या ऐतिहासिक विवाह सोहळ्याला ठाकरे व सोनवणे परिवारावर प्रेम करणारे नातेवाईक, इष्टमित्रपरिवार तसेच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, वैद्यकीय, विधी व न्याय, वाणिज्य व व्यापार, कृषी, पत्रकारिता व विविध क्षेत्रातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.