अमळनेर (प्रतिनिधी) मागील महिन्यात तोक्ते चक्रीवादळात नैसर्गिक आपत्तीमुळे जीव गमावलेल्या आंचलवाडी येथील दोन्ही सख्ख्या बहिणी आणि पळासदडे येथील पुरुष यांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी चार लाखांची मदत प्राप्त झाल्याने आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते सदर रकमेचे धनादेश अमळनेर तहसील कार्यालयात त्यांच्या वारसांना देण्यात आले.
यावेळी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, आंचलवाडी व पळासदाडे येथील ग्रामस्थ व अधिकारी उपस्थित होते,सदर धनादेश आंचलवाडी येथील मयत रोशनी बल्लू बारेला व ज्योती बल्लू बारेला यांचे वडील बल्लू बारेला व त्यांची पत्नी तसेच पळासदडे येथील मयत दिलीप भादूगिर गोसावी यांचे वडील भादूगिर गोसावी यांच्या हातात आमदारांनी सुपूर्द केले. यावेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अजून प्रत्येकी १ लाखांची मदत मिळू शकणार असल्याचे आमदारांनी सांगत त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. मागील महिन्यात १६ जून रोजी ही घटना घडली असताना अवघ्या एकच महिन्यात मदत प्राप्त झाल्याने मयताच्या वारसांसह दोन्ही गावांच्या ग्रामस्थांनी आमदारांसह तहसीलदारांचे विशेष आभार व्यक्त केले.
दरम्यान महाराष्ट्र राज्यात मागील महिन्यात अनेक ठिकाणी वादळाचा धोका निर्माण झाला असताना अमळनेर तालुक्यातील अंचलवाडी येथे वादळामुळे गावाबाहेरील खळ्यात चिंचेचे झाड कोसळून झोपडी दाबली जाऊन त्यात पावरा समाजाच्या ज्योती बारेला (वय १६) आणि रोशनी बारेला (वय १०) या सख्या बहिणींचा दबल्याने मृत्यू झाला होता. रणाईचे येथे राजेंद्र भीमराव पाटील यांच्या शेतात सालदरकी करण्यासाठी हे पावरा कुटुंब आले असल्याने बल्लू बारेला याने गावाबाहेर खळ्यात स्वतःची झोपडी तयार केली होती. १६ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अचानक जोरात वादळ आणि पाऊस सुरू झाला काही कळण्याच्या आत खळ्यात असलेले चिंचेचे झाड कोसळले त्यात बल्लू ची झोपडी दाबली गेली त्याची मोठी मुलगी ज्योती बारेला आणि रोशनी बारेला या दोघे बहिणी झाडाखाली दाबल्या जाऊन त्यांचा मृत्यू झाला होता. संपूर्ण घर दाबले गेल्याने झाड कापून मुलींना व घरचे सामान काढण्यात आले होते, या दुर्देवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त झाली होती.
तर याच दिवशी तालुक्यातील पळासदडे येथे दूपारी ४ वा च्या सुमारास वादळासह पाऊस सुरू झाल्याने मयत दिलिप भादुगिर गोसावी (वय ५७) हे त्यांच्या घराचे काम चालू असल्याने वादळासह पावसाने सुरुवात झाली असता ते पाहण्यासाठी व सिमेंट झाकण्यासाठी गेले असता त्यांच्या डोक्यावर बांधकाम चालू असलेली भिंत पडली होती, यामुळे जखमी अवस्थेत त्यांना ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर ते मृत झाले होते. या दोन्ही घटनांचा तहसील कार्यालय मार्फत पंचनामा होऊन शासकीय मदतीसाठी शासन दरबारी प्रस्ताव सादर झाला होता. सदर प्रस्ताव मंजुरीसाठी आमदार अनिल पाटील व प्रशासनाने देखील योग्य पाठपुरावा केल्याने दोन्ही कुटुंबाना लवकर ही मदत मिळाली असून सदर मदतीमुळे या दोन्ही कुटुंबाना मोठा आधार मिळाला आहे.
राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनाही धनादेश वितरण
यावेळी राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना देखील प्रत्येकी वीस हजार रक्कम प्राप्त झाल्याने सदर लाभार्थीना देखील आमदार अनिल पाटलांच्या हस्ते हे धनादेश वितरित करण्यात आले. यावेळी कै. प्रदीप लक्ष्मण ठाकूर यांचे वारस रूपाली प्रदीप ठाकुर रा. अमळनेर, कै. वसंत आसमन भिल यांचे वारस हिराबाई वसंत भिल रा. दापोरी बु, कै. जगदीश नामदेव पाटील यांचे वारस वंदना जगदीश पाटील रा.देवगाव, कै. प्रवीण शिवाजी पाटील यांचे वारस अर्चना प्रवीण पाटील रा.दहिवद, कै. राजू बाबुराव पारधी यांचे वारस आशाबाई राजू पारधी रा.अमळनेर, कै. शांताराम भोजु भिल यांचे वारस शेवकाबाई शांताराम भिल रा.दापोरी बु., कै. भाऊसाहेब गोरख पाटील यांचे वारस छायाबाई भाऊसाहेब पाटील रा.दहिवद, कै.ईश्वर महादू पाटील यांचे वारस मायाबाई ईश्वर पाटील रा.अमळनेर.आदींना धनादेश देण्यात आले, या सर्व लाभार्थ्यांनी देखील आमदार व तहसीलदार यांचे आभार व्यक्त केले.