मुंबई (वृत्तसंस्था) केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या विधानामुळे पेटलेला वाद आता वाढताना दिसत आहे. दरम्यान, वरुण सरदेसाई यांनी आक्रमक प्रतिक्रिया देत राणे कुटुंबीयांना थेट इशारा दिला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमचे दैवत आहेत. आमच्या देवावर हात उगारण्याची भाषा कुणी करत असेल तर ते युवासैनिक सहन करणार नाही, असे वरुण सरदेसाई म्हणाले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर मुंबईत युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शने करण्यात आली. वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेचे कार्यकर्ते नारायण राणे यांच्या जुहूतील निवासस्थानी जमले होते. यावेळी वरुण सरदेसाई यांनी आक्रमक शैलीत राणे कुटुंबीयांना आव्हान दिले. नितेश राणे यांनी आम्हाला इकडे येऊन दाखवा, असे आव्हान दिले होते. आम्ही उंदराच्या बिळासमोर आलो आहोत. पण त्यांनी काय केलं?, असा सवाल विचारत वरुण सरदेसाईंनी नितेश राणे यांना प्रतिआव्हान दिले.
भाजपचे कार्यकर्ते आमच्यावर दगडफेक करत आहेत. मात्र, पोलीस आमच्यावर लाठीमार करत आहेत. उद्धव ठाकरे आमचे दैवत आहेत. त्यांच्यासाठी आम्ही एक काय हजार लाठ्या खाऊ. भाजपच्या बांडगुळांना पळवून लावू, असे वरुण सरदेसाई यांनी म्हटले.
काय म्हणाले होते नितेश राणे?
नितेश राणे यांनी मंगळवारी सकाळी एक ट्विट केले होते. माझ्या कानावर आलेल्या माहितीनुसार, युवासेनेचे कार्यकर्ते आमच्या जुहू निवासस्थानाबाहेर जमणार आहेत. त्यामुळे एकतर मुंबई पोलिसांनी शिवसैनिकांना रोखावे. अन्यथा पुढे काय घडले त्यासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. सिंहाच्या हद्दीत पाऊल ठेवायची हिंमत करु नका. आम्ही तुमची वाट बघतोय, अशा शब्दांत नितेश राणे यांनी शिवसेनेला डिवचले होते.