येवला (वृत्तसंस्था) तालुक्यातील उंदीरवाडी येथील नदीत बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत मुलांची आई थोडक्यात बचावली. दरम्यान, डोळ्यासमोर दोघं मुलं गमावल्यानंतर आईने मन हेलावणारा आक्रोश केला होता.
उंदीरवाडी येथील भाऊसाहेब जाधव यांच्या पत्नी अनिता जाधव आपल्या दोन मुलांसह सोमवारी (दि. ३०) सकाळी कपडे धुण्यासाठी नारंगी नदीतीरी गेल्या होत्या. त्यावेळी धाकटा मुलगा गौरव (वय १२) याचा पाय घसरून तो नदीच्या पाण्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी मोठा भाऊ स्वप्निलने (वय २०) पाण्यात उडी घेतली. मात्र दोघांनाही पोहता येत नसल्यामुळे ते पात्रात बुडू लागले. हे पाहून आईने देखील पाण्यामध्ये उडी घेतली. मात्र आईलाही पोहता येत नसल्यामुळे आईदेखील पाण्यात बुडू लागली. ही घटना आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या लक्षात येताच, त्यांनी अनिता जाधव यांना पाण्याबाहेर काढले; मात्र अधिक उशीर झाल्यामुळे दोन भावांचा मृत्यू झाला. येवला उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर, दुपारी दोन्ही भावंडांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.