जळगाव (प्रतिनिधी) क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवून देऊ, असे अमिष दाखवून रावेर तालुक्यातील दोन जणांची १२ लाख ८५ हजार रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. दोन महिन्यात वारंवार संपर्क साधून दोघांकडून ही रक्कम उकळण्यात आली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध २७ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
रावेर तालुक्यातील मोरगाव खुर्द येथील केळी व्यापारी असलेले अमोल भिका पाटील (२५) यांना २७ मे ते २७ जुलै या दरम्यान सुजाता, शिवाणी, स्वाती व पिरामल असे नाव सांगणाऱ्या चार जणींनी व्हाटस् अप व टेलिग्राम क्रमांकावर संपर्क साधून त्यांचा विश्वास संपादन केला. क्रिप्टो करंसीमध्ये आपण गुंतवणूक केल्यास अधिक नफा देऊ, असे त्यांना सांगण्यात आले. त्यासाठी त्यांच्याकडून वेळोवेळी रक्कम वसूल करीत एकूण सात लाख १४ हजार रुपये उकळण्यात आले. त्या बदल्यात त्यांना कोणतीही रक्कम परत केली नाही.
अशाच प्रकारे पाटील यांचे मित्र गोविंद प्रभाकर पितृभक्त यांच्याकडूनदेखील पाच लाख ७१ हजार रुपये उकळले. अशी दोघांकडून एकूण १२ लाख ८५ हजार रुपये वेळोवेळ घेण्यात आले. वारंवार पाठपुरावा करून नफा तर दूरच मुद्दल रक्कमही परत न मिळाल्याने पाटील यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून वरील नावाच्या चारही जणींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक बी. डी. जगताप हे करीत आहे.