जळगाव – अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाची वार्ता अत्यंत दु:खद, वेदनादायी आहे. नेहमी प्रसन्न, स्वागतशील व्यक्तिमत्त्व म्हणजे अजितदादा! स्वत:ची एक खास शैली विकसित केलेलं कर्तबगार नेतृत्व. शिस्तबद्ध, वेळेचे नियोजन काटेकोर, दिलेला शब्द कोणत्याही परिस्थितीत पाळण्याची बांधिलकी म्हणजे अजितदादा! राजकीय क्षेत्रात काम करत असताना स्पष्टवक्तेपणा अडचणी निर्माण करतो परंतु दादा धैर्यशील आणि कणखर होते. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी जीवाचं रान करणारा उमदा माणूस देवाने आपल्यापासून हिरावून घेतला आहे. सतत कार्यमग्न राहणारे, चातुर्यपूर्ण संवाद साधून लिलया हजरजबाबीपणे उत्तर देणारे दादा आपल्याला कायम आठवत राहतील.
जैन इरिगेशन कंपनीच्या विविध प्रकल्पांना आवर्जून ते भेट देत असत. जळगाव दौऱ्यावर आले की पहाटेच जैन हिल्स येथे शेतीतील नवनव्या प्रयोगांची पहाणी दादा करत असत. शेती मशागतीतील संशोधन आणि विकास यासंदर्भात माझ्या वडिलांशी श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्याशी दादांचा झालेला संवाद आजही आठवतो. कांताई बंधाऱ्याचे उद्घाटनही १६ ऑक्टोबर २०१३ रोजी त्यांच्या हस्ते झाले होते. त्यावेळी ते म्हणाले होते की, “निसर्गाकडून पावसाच्या माध्यमातून पडणारे पाणी हे बहुमोल आहे. पावसाचा प्रत्येक थेंब अडविण्यासाठी योग्य व्यवस्थापनाची गरज आहे. हा प्रश्न नेटक्या पद्धतीने कसा सोडविता येईल, त्याचे आदर्श उदाहरण म्हणजे कांताई बंधाऱ्याकडे पाहता येईल. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपवर (पीपीपी) आधारित राज्यातील पहिलाच प्रकल्प कांताई बंधारा आहे. या प्रकल्पाच्या गुणवत्तेसारखे काम सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंधारण विभागाकडून व्हावे.”
दादांच्या आकस्मिक जाण्याने केवळ राज्याचीच नव्हे तर संपूर्ण देशाची मोठी हानी झाली आहे, आपल्या कुटुंबातील सदस्यास हिरवून नेले हे वेदनादायी आहे, दादांना भावपूर्ण आदरांजली!
अशोक जैन, अध्यक्ष
जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., जळगाव















