मुंबई (वृत्तसंस्था) केरळात मान्सूनच्या येण्यापूर्वीच पावसानं धुमाकूळ घातला. आता महाराष्ट्रातही मान्सून ठरलेल्या वेळेतच दाखल होणार याची सर्वांना खात्री पटली. दरम्यान, मान्सून, अरबी समुद्रात दाखल झाला असला तरीही तिथंच त्यानं विश्रांती घेतली आहे.
मान्सूनच्या प्रवासात अडथळा निर्माण झाल्यामुळे आता त्याचं आगमन दोन दिवसांनी लांबणीवर गेलं आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून केरळात दाखल होईल. त्यानंतर ५ जूनला कोकणात आणि ७ जूनला मुंबईत मान्सून दाखल होणार आहे. यापूर्वी मान्सून मुंबईत ५ जूनला दाखल होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण, सध्या मात्र त्यासाठी परिस्थिती पूरक नसल्याचं दिसत आहे. १० ते १६ जूनदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.
कशी असेल मान्सूनची वाटचाल?
पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून केरळात दाखल होणार आहे. त्यानंतर राज्यात ३ ते ९ जूनमध्ये तो धडकणार आहे. ७ जूनला मान्सून मुंबईत दाखल होणार आहे. त्यामुळं आता मान्सून लांबला असला, तरीही त्याचं येणं मात्र निश्चित आहे हेच खरं.