मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईतील बोरिवलीत रस्त्याच्या कडेला बसून आपल्या बाळाला स्तनपान करणाऱ्या महिलेला एका भरधाव कारने चिरडलं आहे. तर आईच्या कुशीत विसावलेलं बाळ गंभीर जखमी (Baby injured) झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे.
लाडबाई बावरीया असं मृत पावलेल्या २९ वर्षीय महिलेचं नाव आहे. तर या अपघातात जखमी झालेल्या पाच महिन्याच्या चिमुकल्याचं नाव देवांश आहे. मृत महिलेचा पती धनराज बावरीया यांनी बोरिवली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावरीया दाम्पत्य हे मूळचे राजस्थानातील रहिवासी असून नोकरीच्या निमित्ताने ते काही दिवसांपूर्वी मुंबईत आले होते. गेल्या दोन महिन्यांपासून ते घोडबंदर परिसरात भाडेतत्वावर राहत होते.
एका भरधाव कारने दिली धडक
नोकरी न मिळाल्याने फिर्यादी धनराज आणि त्यांची पत्नी लाडबाई हे दोघंही रस्त्यावर फुगे आणि स्ट्रीट लाइट विकून आपला उदरनिर्वाह चालवत होते. घटनेच्या दिवशी १ फेब्रुवारी रोजी सकाळी हे दाम्पत्य कोरा केंद्र सिग्नल येथे फुगे विकण्यासाठी आले होते. दरम्यान पत्नी मुलासह सिग्नलच्या दुसऱ्या बाजूला फुगे विकत होती, तर धनराज दुसऱ्या ठिकाणी होते. रात्री आठच्या सुमारास पत्नीला एका भरधाव कारने धडक दिली.
बाळाला घट्ट पकडून ठेवल्यानं बाळाचे प्राण वाचले
अपघाताचा आवाज येताच फिर्यादी धनराज यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांची पत्नी लाडबाई आणि मुलगा देवांश दोघंही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. धनराज यांनी क्षणाचाही विलंब न करता दोघांनाही रिक्षातून शताब्दी रुग्णालयात आणलं. पण याठिकाणी डॉक्टरांनी लाडबाई यांना मृत घोषित केलं. देवांशच्या पायाचं हाड तुटलं असून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पत्नीनं बाळाला घट्ट पकडून ठेवल्यानं त्याचा प्राण बचावला असल्याचं धनराज यांनी सांगितलं. या प्रकरणी बोरिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास केला जात आहे.