वर्धा (वृत्तसंस्था) पोळा सणाच्या दिवशी बैलजोडी धुण्याकरिता गावाशेजारील तलावावर गेलेल्या बाप-लेकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुलगाव शहरालगत असलेल्या गुंजखेडा परिसरात घडली. मृतक राजू पुंडलिकराव राऊत (५५) असे वडिलांचे नाव आहे तर चंद्रकांत पुंडलिकराव राऊत (२४) असे मुलाचे नाव आहे.
गुरुवार, १४ सप्टेंबर हा पोळ्याचा दिवस असल्यामुळे राजू राऊत हे आपला मुलगा चंद्रकांतसह बैलजोडीला आंघोळ घालण्यासाठी गावाशेजारील तलावावर गेले होते. त्यांना बैलजोडीची आंघोळ करून पोळ्यासाठी घरी आणून सजावट करावयाची होती. दुपारी १.३० वाजताच्या सुमारास गुंजखेडा येथे असलेल्या इंडियन मिलिटरी स्कूल मागील भागात ते बैलजोडी धुण्याकरिता पोहोचले.
बैल धुत असतानाच वडिलांचा तोल गेला. ते घसरून पाण्यात पडले. ते तलावात बुडत असल्याचे दिसून येताच मुलगा चंद्रकांत वडिलांना वाचविण्यासाठी पाण्यात उतरला. मात्र, खोलवर पाण्याचा दोघांनाही अंदाज आला नाही. ते पाण्यात बुडाल्याने त्यांचा जागीच अंत झाला. राऊत बाप-लेक बुडाल्याची बातमी गावात माहिती पडताच ग्रामस्थांनी तलावावर धाव घेतली. शोधमोहीम राबविल्यानंतर तलावात बुडलेल्या दोघांचे मृतदेह शोधून बाहेर काढण्यात आले. ऐन पोळ्याच्या दिवशी ही घटना घडल्याने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले होते.