सातारा (वृत्तसंस्था) एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळल्याची खळबळजनक घटना सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्याच्या सणबूर येथे उघडकीस आली आहे. आनंदा जाधव (६५), त्यांची पत्नी सुनंदा जाधव (६०), मुलगा संतोष आनंद जाधव (३५) आणि विवाहित मुलगी पुष्पलता दस (४५) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना गुरुवार, २० जुलै रोजी मध्यरात्री घडली. या एकाच कुटुंबातील चार व्यक्तींच्या मृत्यूचे कारण अजून स्पष्ट झाले नाही.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सणबूर, ता. पाटण येथील आनंदा पांडुरंग जाधव (७५), पत्नी सुनंदा आनंदा जाधव (६५), मुलगा संतोष आनंदा जाधव (४५) व विवाहित मुलगी पुष्पलता प्रकाश धस (रा. मंद्रुळकोळे, ता. पाटण) हे चार जण झोपलेल्या स्थितीत मयत आढळून आले. काही दिवसांपासून आनंदा जाधव हे आजारी होते. गुरुवारी सायंकाळी त्यांना कृष्णा हॉस्पिटल, कराडहून उपचार करून सणबूर येथे मुलगा संतोष याने आणले होते.
डॉक्टरांनी त्यांना ऑक्सिजन देण्याचा सल्ला दिला असावा, त्यामुळे त्यांना राहत्या घरी ऑक्सिजनची सुविधा देण्यात आली होती. सणबूर गावापासून काही अंतरावर शिक्षक आनंदा जाधव व कुटुंबीय राहत होते. दरम्यान, डोंगराळ भागामुळे सणबूर परिसरात लाईट नेहमी बंद असते. त्यामुळे जनरेटरचा वापर नेहमीच केला जातो. याच जनरेटरच्या कार्बनमुळे झोपतेच सर्वांचा गुदमरून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. एकाच वेळी एकाच कुटुंबातील चार व्यक्तींचा मृतदेह आढळून आल्यामुळे परिसरासह जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
अशी उघडकीस आली घटना !
जाधव यांच्या कुटुंबातील कुणीही फोन उचलत नसल्या नातेवाइकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यानंतर जाधव यांच्या नातेवाइकाने घराकडे धाव घेतली. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. पोलिसांनी घटनास्थळी येत दरवाजा तोडल्यानंतर हा प्रकार समजला. पोलिसांनी चौघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी कराडला पाठवले आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. घातपात आहे की आत्महत्या?, याबाबतही तपास केला जात आहे.