जळगाव (प्रतिनिधी) मुंबई विमानतळाचे नाव न बदलता “छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई” हेच रहावे, अशी मागणी सै. नियाज अली भैय्या फाऊंडेशनतर्फे मुख्यमंत्री यांना जळगाव जिल्हाधिकारी यांच्याद्वारे निवेदन पाठवून करण्यात आलेली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कुळवाडीभूषण, बहुजन प्रतिपालक आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव सर्व संमतीने मुंबई विमानतळाला देण्यात आलेले होते. परंतु केंद्र सरकारने सर्वत्र खाजगीकरण करण्याच्या चंग बांधलेला असून अशाच प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई हे उद्योगपती अदानीला दिलेला असून त्या अदानी समूहाने विमानतळाचे नाव बदलून अदानी विमानतळ केलेले असून महाराजांचे व्यक्तिमत्व व कार्य हे सह्याद्री पेक्षा उंच असून त्या अदानीने महाराजांचे नाव बदलून स्वतःचे नाव विमानतळाला देऊन महाराष्ट्र द्रोह करून महाराजांचा अपमान करून आम्हा शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. कारण शिवाजी महाराज हे भारत देशाचे महापुरुष, मान सन्मान, अस्मिता व आधारस्तंभ आहेत. म्हणून आम्ही या घटनेचा, खाजगीकरणाचा व महाराजांचा अपमान करणाऱ्यांचा निषेध करतो. तसेच मुंबई विमानतळाचे नाव न बदलता ” छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई ” हेच रहावे, असे यात म्हटले आहे.
याप्रसंगी सै. अयाज अली नियाज अली, शेख शफी, सय्यद जावेद, हाजी शेख सलीमुद्दीन, रहीम कुरेशी, महेमूद शाह, शेख शरीफ, नाझीम पेंटर आदी उपस्थित होते.