मुंबई (वृत्तसंस्था) महापालिकेच्या प्रभाग रचनेला आव्हान देणारी ठाकरे गटानं दाखल केलेली याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली आहे. त्यामुळे मुंबई मनपातील एकूण प्रभाग संख्या २२७ इतकीच राहणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय
यम ठेवत कोर्टानं ठाकरे गटाला मोठा धक्का दिला असल्याचे मानले जात आहे.
हायकोर्टाच्या निर्णयानंतर आता प्रभागांची संख्या २२७ इतकीच कायम राहणार आहे. मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती सुनील शुकरे, न्या. एम. डब्ल्यू. चंदवाणी यांच्या द्विसदस्यीय खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. याचिकेत काही तथ्य नसल्याची टिप्पणीही खंडपीठानं केली आहे. मविआ सरकारनं मुंबई महापालिकेतील 227 वॉर्ड संख्या वाढवून 236 करण्यात आली होती. हा नियम फक्त मुंबई महापालिकेसाठीच होता. यानंतर शिंदे-फडणवीस सरकारनं ही रचना बदलून पूर्वीचीच २२७ वॉर्ड संख्या कायम ठेवली होती. पण निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे राजू पेडणेकर यांनी हायकोर्टात आव्हान दिलं होतं.
राज्य सरकारकडून महाधिवक्ता वीरेंद सराफ यांनी बाजू मांडताना मुंबईतील प्रभाग संख्येची रचना २०११ सालच्या लोकसंख्येच्या आधारावरच केली असल्याचं म्हटलं. तसंच कोरोनामुळे अद्याप जनगणना झालेली नाही त्यामुळे लोकसंख्या वाढीच्या शक्यतेच्या आधारावर प्रभागांची रचना बदलणं योग्य नाही असंही राज्य सरकारच्यावतीनं मांडण्यात आलं. कोर्टानं राज्य सरकारची बाजू मान्य करत शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे मुंबई मनपातील प्रभाग संख्या २२७ इतकीच राहणार आहे.