नागपूर (प्रतिनिधी) राज्यातील परिट समाजाला अनुसूचित जाती (एस.सी.) प्रवर्गात समाविष्ट करावे, अशी ठाम मागणी आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषद अधिवेशनादरम्यान सभागृहात केली.
यावेळी ते म्हणाले की, “परिट समाजाचा एस.सी. प्रवर्गात समावेश करावा, अशी राज्यभरातील समाजाची मागणी आहे. ही मागणी शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी मोठ्या संख्येने समाजबांधव नागपूर येथे जमा झाले आहेत. त्यांची मागणी न्याय्य असून राज्य सरकारने ती तातडीने मान्य करावी.”
पुढे ते म्हणाले की, “देशातील सात राज्यांत परिट समाजाचा एस.सी. प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतही यापूर्वी हा प्रवर्ग लागू होता; परंतु सन 1960 नंतर परिट समाजाला एस.सी. प्रवर्गातून वगळण्यात आले. त्यामुळे आता पुन्हा या समाजाचा अनुसूचित जाती प्रवर्गात समावेश करून त्यासंबंधीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा,” अशी आग्रही मागणी त्यांनी मांडली.
यासोबतच, निवडणूक कालावधीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परिट समाजासाठी संत गाडगे महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली होती; मात्र अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही, असेही खडसे यांनी निदर्शनास आणून दिले.
“संत गाडगे महाराज आर्थिक विकास महामंडळाची तात्काळ स्थापना करून या महामंडळामार्फत परिट समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, समाजबांधवांना उद्योग उभारणीसाठी अनुदान तसेच समाजहिताच्या इतर सवलती देण्यात याव्यात,” अशी मागणीही त्यांनी सभागृहात केली.















