मालेगाव : येथील न्यायालयाच्या आवारात तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना पवारवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार दिलीप निकम यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांनी त्यांच्या मित्राला बहिणीच्या लग्नासाठी ५० हजार रुपये दोन महिन्यांसाठी हातउसनवारीने दिले होते. दोन महिन्यांचा काळ लोटला, तरी पैसे न मिळाल्याने दोन्ही मित्रांमध्ये शाब्दिक वाद झाले. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेल्या मित्राकडून गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस हवालदार दिलीप निकम यांनी तक्रारदाराकडे पाच हजारांची मागणी केली होती. नंतर तक्रारदार, त्याचे दाजी व पंच साक्षीदार यांच्या समक्ष पोलीस हवालदार निकम यांनी पाच हजार रुपयांची मागणी करून तडजोडी अंती तीन हजार रुपये बुधवारी (दि.२४) रोजी तक्रारदाराकडून न्यायालय आवारात स्वीकारले. निकम यांनी तीन हजारपैकी एक हजार रुपये तक्रदार यांना परत करत दोन हजार रुपये लाच म्हणून स्विकारत असतानाच लाच लुचपत विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. निकम यांच्या विरुध्द छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस नाईक चौधरी, पोलीस शिपाई अनिल गंगोडे, हवालदार पंकज पळशीकर, विनोद पवार यांनी ही कारवाई केली.