जालना (वृत्तसंस्था) जालना येथून बदली झाल्याने कुटुंबासह हिंगोली येथे गेलेल्या पोलिस निरीक्षक शालिनी नाईक यांच्या जालना शहरातील पोलिस क्वॉटर येथील घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ७३ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी पोलिस निरीक्षक शालिनी नाईक यांचे पती कुंडलिक भगवान आसोले यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुंडलिक आसोले हे कुटुंबासह जालना शहरातील पोलिस क्वॉटर येथे राहतात. त्यांची पत्नी शालिनी नाईक या जालना येथील सायबर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची २ जुलै रोजी हिंगोली येथे बदली झाली होती. बदली झाल्याने कुटुंबासह त्या हिंगोली येथे गेल्या होत्या. हिच संधी साधत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटात ठेवलेली ४० हजार रूपये किंमतीची चाळीस मण्याची पोत, मंगळसूत्र, कानातील फुले, ३३ हजार रूपये किंमतीच्या कानातील बाळ्या, मनगटी असा एकूण ७३ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ८ जुलै रोजी सेवानिवृत्त चव्हाण यांनी फोन करून घरात चोरी झाल्याचे कुंडलिक आसोले यांना सांगितले. ते लगेच घरी आले. त्यांना घरातील साहित्य अस्त-व्यस्त पडलेले दिसले. या प्रकरणी कुंडलिक आसोले यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.