जळगाव (प्रतिनिधी) शहरातील एच.डी.फायर कंपनीमध्ये संरक्षक भिंतीच्या खाली खड्डा खोदून कंपनीत प्रवेश करत १ लाख ४५ हजार ३०० रूपयांचा माल लांबविणाऱ्या जुन्या कामगारासह त्याच्या दोन साथीदारांना एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली आहे. तिघं जण दररोज पार्ट्या करत असल्याची माहिती एका खबऱ्यांने पोलिसांना कळवले होते. त्यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आणि त्यानंतर चोरीचा पर्दाफाश झाला.
एमआयडीसी परिसरातील एचडी फायर प्रोटेक्ट प्रा. लि. या कंपनीच्या कंपाऊंडच्या भिंती खालची माती काढून तिघांनी 2 व 3 मे च्या मध्यरात्री कंपनीत प्रवेश केला होता. त्यानंतर कंपनीतील 1 लाख 45 हजार 300 रुपये किंमतीच्या एनगॉट ब्राँझ धातूच्या पट्टया चोरून नेल्या होत्या. या प्रकरणी कंपनीचे सिनीयर मॅनेजर मोहन बलवंत कुलकर्णी यांनी अज्ञात चोरटयांविरुध्द एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, तीन तरुण मागील काही दिवसापासून दररोज पार्ट्या करीत असून दारूवर मोठ्या प्रमाणात खर्च करत असल्याची गुप्त माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली.
त्यानुसार देवानंद उर्फ देवा गोकुळ कोळी (रा. स्वामी समर्थ मंदीरा जवळ, कुसुबा – जळगाव), विक्की आत्माराम कोळी (रा. दुर्गादेवी मंदीरा जवळ सावदा ता रावेर ह.मु. स्वामी समर्थ केंद्राजवळ, रामेश्वर कॉलनी जळगाव) आणि, ईश्वर श्रवण महाजन (मुळ रा. कुसुबा ता. रावेर ह.मु. स्वामी समर्थ, केंद्राजवळ, रामेश्वर कॉलनी, मेहरुण – जळगाव) यांच्यावर पोलिसांनी लक्ष केंद्रित करत रात्रीच त्यांना कुसूंबा व सुप्रिम कॉलनी परिसरातून ताब्यात घेतले. खाक्या दाखवताच तिघांनी गुन्हा कबूल केला.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी देवानंद हा कंपनीमध्ये कामाला होता. त्यामुळे तोच चोरीचा मुख्यसूत्रधार असल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, छगन तायडे, किरण पाटील, इम्रान सैय्यद, सचिन पाटील, साईनाथ मुंडे, ललित नारखेडे यांनी ही कारवाई केली आहे.