जळगाव (प्रतिनिधी) सोबत असलेल्या दोन वर्षाच्या चिमुकलीला घेवून आई रेल्वेतून स्थानकावर उतरत होती. यावेळी ती चिमुकली हातातून निसटल्याने थेट रेल्वेखाली पडली. रेल्वेला सिग्नल मिळाल्यानंतर देखील तेथे असलेल्या फिरोज तडवी या पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या जीवाची पर्वा न करता थेट रेल्वेरुळावर उडी घेवून त्या चिमुकलीला सुखरुप बाहेर काढल्याची घटना जळगाव रेल्वे स्थानकावर घडली.
घाई-गडबडीत दोन वर्षाची चिमुकली हातातून निसटली !
एमआयडीसी पोलीस ठाण्यात नियुक्तीस असलेले फिरोज तडवी हे पोलीस कर्मचारी शासकीय कामासाठी गुरुवारी पहाटेच्या सुमारास नाशिक जाण्यासाठी जळगाव रेल्वे स्थानकावर उभे होते. याठिकाणी सेवाग्राम एक्सप्रेस आल्यानंतर त्यातून एक महिला आपल्या दोन मुलांसह रेल्वेतून उतरत होत्या. एक चिमुकला कडेवर असताना दोन वर्षाची चिमुकली मात्र त्यांच्या हातातून निसटल्यामुळे ती थेट रेल्वेखाली रुळावर जावून पडली. त्यामुळे भेदरलेल्या त्या मातेने एकच आक्रोश सुरु केला.
जीवाची पर्वा न करता घेतली रेल्वेरुळार उडी !
मातेचा आक्रोश बघताच फिरोज तडवी यांनी रेल्वेला सिग्नल मिळालेला असतांना देखील आपल्या जीवाची पर्वा न करता थेट रेल्वेखाली उडी घेतली. त्यानंतर रुळावर पडलेल्या चिमुकलीला सुखरुप बाहेर काढत तिच्या आईच्या ताब्यात दिले. रेल्वेला सिग्नल मिळालेला होता. त्यामुळे अगदी काही सेकंदही इकडे तिकडे झाले असते तर तडवी यांचा जीव धोक्यात आला असता.. त्यामुळे तडवी यांनी केलेल्या शौर्याचा रेल्वे स्थानकावर उपस्थित असलेल्या प्रवाशांनी टाळ्या वाजवीत कौतुक केले. तसेच त्या चिमुकलीच्या आईने देखील त्या पोलीस कर्मचाऱ्याचे आभार मानले.