नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी पाच वाजता देशातील जनतेला संबोधित करणार आहेत. सध्या देशात काही दिवसापासून कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. मात्र दररोजचा मृतांचा आकडा धडकी भरवणारा आहे. त्यामुळे देशातील सध्याच्या परिस्थितीवर पंतप्रधान मोदी काय बोलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
यामध्ये देशातील करोनाची स्थिती, म्युकरमायोकोसिसचा धोका, देशभरातील लसीकरण मोहीम, शास्त्रज्ञांनी तिसऱ्या लाटेची वर्तवलेली शक्यता तसेच, अनेक राज्यांमध्ये सुरू झालेली अनलॉक प्रक्रिया आदी प्रमुख मुद्यांवर मोदी बोलू शकतात, असा अंदाज लावला जात आहे.
तसेच देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाली आहे. तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन केलेली अनेक राज्य अनलॉकच्या दिशेनं वाटचाल करत आहेत. तसेच अनेक राज्यांनी निर्बंध शिथील करण्याचा निर्णयही घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर मोदी पुढे काय काळजी घेतली जावी, यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, कोविड-१९ ची मेड इन इंडिया लस तयार केल्याबद्दल आणि कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर त्याचा प्रतिकार करण्यासाठी केवळ एका वर्षातच अन्य उपाययोजनांना चालना दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक केलं होतं.