जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, जळगावच्या कार्यक्षेत्रात खाजगी कामानिमित्त वापरण्यात येणाऱ्या रुग्णवाहिकांसाठी कमाल भाडेदर वाहनाचा प्रकार, सरासरी धाव, चालकाचा भत्ता, घसारा व ग्राहक निर्देशांक विचारात घेऊन निश्चित करण्यात आल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी दिली आहे.
मारुती व्हॅन, मारुती इको (अवातानुकूलीत) वाहनासाठी दहा किलोमीटरपर्यंत पाचशे रुपये, वीस किलोमीटरपर्यंत एक हजार रुपये, तीस किलोमीटरपर्यंत पंधराशे रुपये, तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी दहा रुपये प्रति किलोमीटर याप्रमाणे दर निश्चित केले आहे.
टाटा सुमो व जीपसदृश बांधणी केलेली वाहने (अवातानुकूलीत) वाहनासाठी दहा किलोमीटरपर्यंत सहाशे रुपये, वीस किलोमीटरपर्यंत बाराशे रुपये, तीस किलोमीटरपर्यंत अठराशे रुपये, तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी बारा रुपये प्रति किलोमीटर याप्रमाणे दर निश्चित केले आहे.
टाटा ४०७/ स्वराज माझदाच्या प्रकारच्या साठ्यावर बांधणी केलेली वाहने (अवातानुकूलीत) वाहनासाठी दहा किलोमीटरपर्यंत सातशे रुपये, वीस किलोमीटरपर्यंत चौदाशे रुपये, तीस किलोमीटरपर्यंत एकवीसशे रुपये, तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी पंधरा रुपये प्रति किलोमीटर याप्रमाणे दर निश्चित केले आहे.
आयसीयु (कार्डीओ व्हॅन) (वातानुकूलीत) वाहनासाठी दहा किलोमीटरपर्यंत दोन हजार रुपये, वीस किलोमीटरपर्यंत तीन हजार रुपये, तीस किलोमीटरपर्यंत चार हजार रुपये, तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी वीस रुपये प्रति किलोमीटर याप्रमाणे दर निश्चित केले आहे.
हे संपूर्ण भाडेदर अंतरानुसार लागू राहतील. या भाड्यापेक्षा कमी अथवा मोफत सेवा देता येवू शकेल, परंतु निश्चित केलेल्या भाड्यापेक्षा जास्त भाडे आकारणी करता येणार नाही. या भाडे दरपत्रकात चालकाचा पगार व इंधनाचा खर्च समाविष्ठ राहील. वाहन तांत्रिकदृष्टया सक्षम व स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी चालकाची व मालकाची राहील. वाहनाच्या तांत्रिक दोषाकरीता वाहनचालक व मालक जबाबदार राहतील.
नमूद भाडे दरपत्रकापेक्षा जादा भाडे आकारणी होत असेल तर सबंधित रुग्णवाहिका वाहनधारकाची तक्रार उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव यांचे दूरध्वनी क्रमांक 0257/2261819 व mh19@mahatranscom.in या मेलवर करावी. असेही लोही यांनी कळविले आहे.