जळगाव (प्रतिनिधी) जामनेर तालुक्यातील नेरी दिगर येथील एका कथित मौलवी बाबाने बेशुद्ध अवस्थेत बनविलेल्या अश्लील व्हिडीओचा धाक दाखवून धर्मपरिवर्तन करून लग्न केल्याचे वृत्त ‘द क्लिअर न्यूज’ने प्रकाशित करताच जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली. परंतू एक महिन्यापासून गुन्हा दाखल होऊन देखील पोलीस कारवाई करत नाहीत. पोलिसांना मी हप्ते देतो, त्यामुळे ते माझ्या खिशात आहेत. तू कुणाकडेही जा माझे काहीच होणार नाही, अशी धमकी अलताफ मेहमुद मणियार उर्फ अलिबाबाने पिडीत विवाहितेला दिली असल्याचेही आता समोर आले आहे. एवढेच नव्हे तर, फिर्यादीतून धर्मपरिवर्तनसह प्राणी तस्करीसह अनेक गंभीर मुद्दे वगळल्याचा आरोप देखील पिडीत विवाहितेने केला आहे.
अश्लील व्हिडीओचा धाक दाखवून धर्मपरिवर्तन करून केलेल्या लग्नाची थरारक कहाणी. तसेच या बाबाच्या वासनांध कृत्यांची आपबितीची व्यथा एका महिलेने आज ‘द क्लिअर न्यूज’कडे मांडली. धक्कादायक म्हणजे गुन्हा दाखल होऊन एक महिना झाल्यानंतर देखील कुठलीही कारवाई होत नसल्याचा आरोपही पिडीतने केला होता. परंतू गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी कारवाई का केली नाही?, असे विचारले असता पिडीत विवाहितेने सांगितले की, अलिबाबा कायम सांगायचा पोलिसांना मी हप्ते देतो, त्यामुळे ते माझ्या खिशात आहेत. तू कुणाकडेही जा माझे काहीच होणार नाही. अगदी मी पोलिसांना सांगितले की, अलिबाबा हा प्राण्याची तस्करी करतो, स्फोटकं बनवितो. एवढेच नव्हे तर सोशल मिडीयावर अश्लील व्हिडीओ टाकतो. विशेष म्हणजे याबाबतचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत, असं सांगून देखील जामनेर पोलिसांनी फिर्यादीत ते मुद्दे घेतले नाहीत. पोलीस तपासात समोर आल्यानंतर आम्ही बघू, काय करायचे ते असं सांगून अपूर्ण फिर्याद घेतल्याचा आरोपही पिडीत विवाहितेने केला आहे. तसेच सायंकाळी ५ वाजेपासून तर रात्री १२ वाजेपर्यंत पोलीस स्थानकात बसवून ठेवण्यात आल्याचा आरोप देखील पिडीत विवाहितेने केला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल होऊन एक महिना झाला तरी पोलिसांनी आरोपींना अटक सुद्धा केली नसल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. जामनेर पोलिसात अलताफ मेहमूद मणियार, सोहेल अन्सारीसह दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल आहे.