नवी दिल्ली (वृत्तसंस्था) शिंदे गटाने आम्हाला विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवले नाही, म्हणून सरकार स्थापन करण्याची संधी मिळाल्याचा दावा केला. तो एका अर्थाने योग्य असल्याचे निरीक्षण सरन्यायाधीश यांनी नोंदवले. (Maharashtra Political Crisis)
…त्यामुळे आमदारांना मतदानापासून रोखता येणार नाही : नीरज किशन कौल
राज्यातल्या सत्तासंघर्षावरुन सध्या सर्वोच्च न्यायालयात रणकंदन सुरु असून आजची सुनावणी संपली आहे. उद्या या सुनावणीचा शेवटचा दिवस आहे. दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तीवाद करण्यात येत असून उद्या पुन्हा शिंदे गटाच्या वतीनं नीरज किशन कौल युक्तीवाद करणार आहेत. दरम्यान, आम्हाला 21 तारखेला नोटीस पाठवली होती. त्यात बैठकीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. आम्ही या बैठकीला उपस्थित नव्हतो. इतकाच आमच्याविरुद्ध आरोप आहे. आम्ही दोन बैठकींना गैरहजर राहिलो. त्या आधारावर ते आम्ही स्वेच्छने सदस्यत्वाचा त्याग केल्याचे सांगत आहेत. मात्र, अजून आमदारांवर कसलीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे आमदारांना मतदानापासून रोखता येणार नाही. ते अपात्र ठरले तर त्यांनी निर्णय किंवा त्या निर्णयावर केलेले मतदान अपात्र कसे ठरवणार, असा सवाल कौल यांनी आज केला. बहुमत आणि व्हीप पाहून अध्यक्षांनी निर्णय घ्यावा. विधिमंडळाचे बहुतांश सदस्य त्यांच्या राजकीय अधिकारांनुसार प्रतोद नियुक्ती करतात. त्यानुसार आम्ही त्याच प्रतोदाचा व्हीपचे पालन केले, असे कौल यांनी सांगितले. यावर सर्वोच्च न्यायालयाने कोणता व्हीप पाळणार, असा सवाल केला. खरे तर विधिमंडळ पक्षाने नेमलेल्या प्रतोदचा व्हीपचे पालन व्हावे लागते. मात्र, इथे दोन व्हीप एकाच वेळी अस्तित्वात आहेत. मग तुमच्या मते बहुसंख्य सदस्यांनी नेमलेल्या प्रतोदचा व्हीपचे पालन व्हायला हवे का, असा सवालही यावेळी सर्वोच्च न्यायालयाने विचारला.
सरन्यायाधीश काय म्हणाले?
दहाव्या सुचीनुसार विचार केला तर तुम्ही जरी म्हणत असाल की आम्हीच शिवसेना आहोत, तरी दोन गट तर आहेतच, फुट पडल्यावर दरवेळी पक्ष सोडलाच जातो असा नाही असं सरन्यायाधीशांनी नीरज किशन कौल यांना सांगितलं. दोन्ही गट पक्षातच असले तरी दहावी सूची लागू होईलच, कोणत्या गटाकडे बहुमत आहे याने दहाव्या सूचीच्या तरतुदींवर परिणाम होत नाही असंही ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस राज्यपालांना भेटले आणि त्यानंतरच ठाकरे सरकारवर विश्वास दर्शक ठराव मांडण्याचे निर्देश दिले असं न्यायालयानं म्हटलं. तसेच नंतर सरकार स्थापन करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनाच का बोलावलं असा सवालही न्यायालयाने विचारला. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयातली सुनावणी चांगलीच रंगली. शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी शिवसेनेत फूट पडली म्हणजे नेमके काय झाले, याचा पट तारीखनिहाय न्यायालयात उभा केला. शिंदे गटाला विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवले नाही. त्यामुळेच त्यांना सरकार स्थापन करण्याची संधी मिळाल्याचा दावा त्यांनी केला. हा दावा एका अर्थाने योग्य असल्याचे निरीक्षण यावेळी सरन्यायाधीशांनी नोंदवले.
शिवसेनेच्या 39 आमदारांसोबत मविआच्या 16 आमदारांचाही ठाकरे सरकारवर विश्वास नव्हता
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवेळी, म्हणजे राहुल नार्वेकर यांच्या निवडीवेळी मतदान घेण्यात आलं होतं, त्यावेळी महाविकास आघाडीचे 16 आमदार गैरहजर होते. नेमक्या याच गोष्टीचा संदर्भ घेत नीरज किशन कौल यांनी आज युक्तीवाद केला. ते म्हणाले की, शिवसेनेचे 39 आमदार बाहेर पडले नसते, किंवा ते अपात्र जरी ठरले असते तरीही ते सरकार पडलं असतं. कारण अध्यक्षपदाच्या निवडीवेळी महाविकास आघाडीचे 16 आमदार गैरहजर होते. या लोकांचं मत ठाकरे सरकारला नव्हतं, कारण त्यांनाही सरकारवर विश्वास नव्हता, सरकारने त्यांचा विश्वास गमावला होता.
उद्या काय होणार ?
सर्वोच्च न्यायालयाच्या उद्याच्या सुनावणीत सकाळी एक तास शिंदे गटाचे वकील नीरज कौल पुन्हा युक्तिवाद करतील. त्यानंतर महेश जेठमलानी आणि मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद होईल. सॉलिसिटर जनरल हरिश साळवे यांचा युक्तिवादही दुपारच्या जेवणापूर्वी होईल. मध्यंतरानंतर कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद होईल.