मुंबई (वृत्तसंस्था) राज ठाकरे उपस्थित असलेल्या एका कार्यक्रमावेळी ठाण्यात स्टेज कोसळल्याची घटना घडली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) सुरक्षित आहेत. गोरेगावमध्ये हा कार्यक्रम सुरु होता. राज ठाकरे यांचे सुरक्षारक्षक, पोलीस आणि कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे ते थोडक्यात बचावले.
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आज चांदीवली आणि गोरेगाव येथे मनसेच्या नव्या पक्ष कार्यालयाचं उदघाटन आज राज ठाकरे यांच्या हस्ते झालं. यावेळी राज ठाकरे यांना पाहण्यासाठी कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती. चांदीवली येथील कार्यालयाचं उदघाटन करुन झाल्यानंतर राज ठाकरे गोरेगाव येथील कार्यालयाचं उदघाटन करण्यासाठी रवाना झाले होते. गोरेगाव येथील कार्यालयाचं उद्घाटन करताना कार्यकर्त्यांची तुफान गर्दी झाली होती. राज यांच्या हस्ते उदघाटन झाल्यानंतर कार्यालयाच्या शेजारीच एक स्टेज उभारण्यात आला होता. त्यावर राज ठाकरे, बाळा नांदगावकर यांच्यासह मनसेचे इतर नेते आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. पण स्टेजवर क्षमतेपेक्षा अधिक कार्यकर्ते आल्यानं स्टेजचा पुढील भाग कोसळला.
राज ठाकरे यांच्या शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला जात असतानाच हा प्रकार घडला. स्टेजचा फक्त पुढचा भाग कोसळल्यानं राज ठाकरे थोडक्यात बचावले. राज यांच्या सुरक्षारक्षक, पोलीस आणि कार्यकर्त्यांनी राज यांना सावरलं. त्यानंतर राज ठाकरे यांनी माईक हातात घेत कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आणि गोंधळून न जाण्याचं आवाहन केलं. राज ठाकरे सुखरूप असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नसल्याचं पक्षाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे.