मुंबई (वृत्तसंस्था) कट्टर शिवसैनिक माझ्यासोबत ठामपणे उभे आहेत. विकाऊ होते ते विकले गेले. काय भाव ते तुम्हाला माहित आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली आहे. यावेळी उपस्थितांनी ५० खोके एकदम ओके या घोषणा दिल्या.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते झाले. उद्धव ठाकरेंनी ठाण्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिंदे गटावर आपल्या भाषणातून चांगलीच तोफ डागली आहे. ‘सध्या राजकारणात विकृत आणि गलिच्छपणा सुरू असतानाही शिवसेना मात्र आपल्या मूळ हेतूपासून दूर गेलेली नाही, याचा मला अभिमान आहे. अन्यायावर लाथ मारा, हे शिवसेनेचं ब्रीदवाक्य आहेच. पण त्यासोबतच ८० टक्के समाजसेवा आणि २० टक्के राजकारण हे आपल्याला शिवसेनाप्रमुखांनी शिकवलं आहे. अस्सल आणि निष्ठावंत शिवसैनिक या व्यासपीठावर आहेत आणि बाकीचे जे विकाऊ होते ते विकले गेले. काय भावाने विकले गेले ते आपल्या सगळ्यांना माहीतच आहे, मी ते सांगण्याची गरज नाही,’ अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. त्याचबरोबर लवकरच ठाण्यात मोठी सभा घेणार असल्याचेही आपल्या भाषणात सांगितले आहे. यावेळी उद्धव ठाकरेंसोबत राजन विचारे यांच्यासह जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातल्या टेंभी नाका भागात जाऊन आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आहे. ही घटना महत्त्वाची मानली जाते आहे. आनंद आश्रम या ठिकाणी ते गेलेले नाहीत. आनंद दिघे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरु मानतात. अशात याच ठाण्यात जाऊन उद्ध ठाकरेंनी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आणि हार घातला. आनंद आश्रम या ठिकाणीही उद्धव ठाकरे जाणार अशी चर्चा होती. मात्र त्या ठिकाणी बाळासाहेबांची शिवसेना पक्ष कार्यालय असा फलक लावण्यात आला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे तिथे गेले नाहीत अशी चर्चा ठाण्यात रंगली होती.