छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी फेटाळून लावली आहे.
माजी नगरसेवक महंमद मुश्ताक अहमद यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र हे प्रकरण सध्या मुंबई उच्च न्यायालयात प्रविष्ट असल्यामुळे आधी तिथे निर्णय होऊ द्या, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. यापूर्वी १९९६ मध्येही औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. त्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने ‘जैसे थे’ आदेश दिले होते. त्यानंतरही पुन्हा शहराचे नाव बदलण्यात आले. हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.
दरम्यान, राज्य सरकारच्या वकिलांनी सांगितले की, याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल असून सोमवारी त्याची सुनावणी आहे. त्यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. पी.एस. नरसिंहा व न्या. जे. बी. पारडीवाला यांच्या खंडपीठाने ‘आधी उच्च न्यायालयात निर्णय होऊ द्या, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात या’ असे सांगून सुनावणी घेण्यास नकार दिला.
छत्रपती संभाजीनगर व धाराशिवच्या नामांतराची अधिसूचनेवर आक्षेप, हरकर्तीसाठी २७ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. २४ मार्चपर्यंत ‘छत्रपती संभाजीनगर ‘ला विरोध करणारे १ लाख ४८ हजार २०३ तर ‘धाराशिव विरोधात २८, ५५५ आक्षेप अर्ज विभागीय आयुक्तालयात दाखल झाले होते. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ ४,११६ पत्रे दाखल झाली आहेत.