जळगाव (प्रतिनिधी) मराठा विद्या प्रसारक संस्थप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील संशयित तत्कालीन विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांनी अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयात दाखल केला होता. त्या जामीन अर्जावर गुरुवारी कामकाज झाल्यानंतर न्यायालयाने तपासधिकारी बोलावतील तेव्हा हजर राहण्याच्या अटीवर त्यांना अंतरीम जामीन मंजूर केला.
जिल्हा मराठा विद्या प्रसारक शैक्षणिक संस्थेच्या कार्यालयात शिरुन कागदपत्रे चोरुन नेल्याप्रकरणी तक्रारदार निलेश भोईटे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अॅड. विजय भास्करराव पाटील, तत्कालीन विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण, कुलसचिव विनोद पाटील, संजय भास्करराव पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयीन कोठडीत असलेल्या अॅड. विजय पाटील यांनी न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर न्यायालयाने तपासाधिकाऱ्यांकडून खुलासा मागविला होता. त्यानुसार तपासाधिकारी से मांडण्यासाठी मुदवाढ मागितली होती. त्यावर न्यायालयाने त्यांना एक दिवसाची मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर या प्रकरणावर गुरुवारी से सादर केल्यानंतर युक्तीवाद होईल. अॅड. पाटील यांच्या तर्फे अॅड. प्रकाश बी. पाटील हे तर सरकार पक्षातर्फे अॅड. अविनाश पाटील हे कामकाज पाहत आहेत.
अटी, शर्तीवर अॅड. चव्हाणांना अंतरीम जामीन !
घटनेच्या दिवशी अॅड. प्रवीण चव्हाण यांनी पुणे येथील न्यायालयात कामकाज केले असून तेथे हजेरी देखील लावलेली आहे. त्यामुळे या घटनेशी त्यांचा काहीही संबंध नसल्याचा युक्तीवाद अॅड. चव्हाण यांच्यावतीने अॅड. गोपाळ जळमकर यांनी न्यायालयात केला. त्यावर न्यायालयाने तपासाधिकारी बोलवतील, तेव्हा हजर होणे, साक्षीदारांवर दबाब आणू नये, अशा अटीशर्तीवर त्यांना अंतरिम मंजूर केला.