नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाच्या रुग्ण संख्येत (Coronavirus) पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. त्यातच आता भारताच्या कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. एन. के. अरोरा (Dr. N. K. Arora) यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट (Coronavirus third wave in India) आली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच ओमायक्रॉन बाधितांपैकी ७५ टक्के रुग्ण हे देशातील प्रमुख महानगरांमध्ये आढळून आले असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
“जिनोम सिक्वेन्सनुसार तुम्ही व्हेरियंटकडे पाहिलंत तर डिसेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात पहिल्या व्हायरसची नोंद झाली. गेल्या आठवड्यात देशात एकूण १२ ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले असून ते आता २८ टक्क्यांवर पोहोचले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यात महत्वाचं म्हणजे मुंबई, कोलकाता आणि खासकरुन दिल्ली अशा मोठ्या शहरांमधील रुग्णसंख्या जास्त असून ७५ टक्क्यांहून अधिक आहे,” अशी माहिती डॉक्टर अरोरा यांनी दिली आहे. डॉक्टर अरोरा राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचे चेअरमनदेखील आहेत.
देशात कोरोनाची तिसरी लाट आल्याचं स्पष्ट दिसतंय
भारतात आतापर्यंत १७०० ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली असून यामधील सर्वाधिक महाराष्ट्रात असून ५१० रुग्ण आढळले आहेत. यासोबत देशातील कोरोना रुग्णसंख्येत २२ टक्क्यांची वाढ पहायला मिळाली आहे. यामुळे डॉक्टर अरोरा यांनी देशात करोनाची तिसरी लाट जवळपास आली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. “देशात कोरोनाची तिसरी लाट आल्याचं स्पष्ट दिसत आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट यासाठी जबाबदार असून सध्या तरी तो ओमायक्रॉन आहे,” असं यावेळी त्यांनी सांगितलं. डॉक्टर अरोरा यांनी यावेळी १५ ते १८ वर्षातील वयोगटातील मुलांना देण्यात येणारी लस असुरक्षित असल्याचा दावा फेटाळला आहे.