नाशिक (प्रतिनिधी) येथील बनावट मद्य कारखान्याचे धागेदोरे थेट धुळे, जळगाव, नंदुरबारपर्यंत जाऊन पोहचले आहे. मंगल कार्यालयात बनावट कारखान्यामध्ये देशी दारू तयार करून धुळे, जळगाव आणि नंदुरबारमधील देशी मद्य दुकानात विक्री होत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. दरम्यान, या मद्य तस्करीमध्ये नंदुरबारच्या माजी आमदाराचा हात असल्याचेही निष्पन्न झाले आहे.
यासंदर्भात अधिक असे की, पोलिसांनी बोगस मद्य कारखान्याचा मालक संशयित संजय मल्हारी दाते (४७, रा. गोंदेगाव, ता. निफाड) याच्यासह अंबादास खरात (रा. चांदोरी) शुभम शिंदे, सुरेश देवरे, दीपक पाटील (सर्व रा. धुळे), पंकजकुमार मंडल, मणिकांतकुमार मंडल (रा. बिहार) या सात संशयितांना अटक केली आहे. कारखान्यात बिहारमधील आठ अल्पवयीन कामगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या संशयितांकडून धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली आहे. अधीक्षक सचिन पाटील यांच्या पथकाने चांदोरी शिवारात उदयराजे लॉन्समध्ये देशी मद्यनिर्मिती कारखान्यावर छापा टाकून बनावट देशी मद्याचे २ हजार बॉक्स, १५ हजार रिकाम्या बॉटल, २० हजार लिटर स्पिरिट आणि मद्य तयार करण्यासाठी इंडस्ट्रियल आरओ प्लँट, पाण्याच्या टाक्या, ट्रक असा सुमारे दीड कोटीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. संशयित पोलिस कोठडीत असून बोगस देशी मद्य धुळे, जळगाव आणि नंदुरबारमध्ये लिकर दुकानात विक्री होत असल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, बनावट मद्य कारखाना प्रकरणात नंदुरबार येथील माजी आमदाराचे नाव पुढे येत असून दातेच्या बोगस कारखान्यात तयार होत असलेले मद्य मोठ्या प्रमाणात जळगाव, धुळे आणि नंदुरबार येथील लिकर दुकानात विक्री होत असल्याने पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास सुरू आहे.
वाइनशॉप सम्राट अण्णा कोण?
या प्रकरणात वाइन शॉप सम्राट अण्णाचे नाव पुढे येत आहे. संशयित दाते हा सराईत असून शिवसेनाप्रणीत एका संघटनेचा तालुका अध्यक्ष आहे. संशयिताची परिसरात दहशत असून जमिनी बळकावणे, दमदाटी करणे आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत. संशयितावर तडीपारीची कारवाई केल्याची माहिती पोलिसांनी दिली. माजी आमदाराने राजकीय वजन वापरत तडीपारी रद्द केली असल्याचे तपासात समोर आले आहे.