जळगाव (प्रतिनिधी) शहरातील कांचन नगर परिसरात आज सकाळी एका तरुणाच्या घरात घुसून चौघांनी गोळीबार केला. हल्लेखोरांनी चार ते पाच राऊंड फायर केल्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, आकाश सपकाळे या तरूणावर आज सकाळी आठच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी थेट घरात शिरून गोळीबार केला. यात सुदैवाने कुणी जखमी झाले नाही. यानंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. आकाशच्या कुटुंबीयांनी प्रतिकार केल्याने हल्लेखोरांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला असता पायरीवरून पाय घसरून तो पडल्याने त्याच्या डोक्याला मार लागला असल्याचे कळते. दरम्यान, हल्लेखोरांपैकी चार जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. दुसरीकडे घरात ४ काडतूस पडल्या असून घरा बाहेर १ गावठी कट्टा आणि १ काडतूस पडले आहे. घटनास्थळी शनिपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक बळीराम हिरे पथकासह पोहचले असून तपास सुरू आहे. हल्ल्यात २ पिस्तुलाचा वापर झाल्याची माहिती समोर येत असून हल्ला पूर्व वैमनस्यातून झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.